पिंपरी-चिंचवड : महिलांच्या सुरक्षिततेची गरज ओळखून पुणे शहर पोलिसांच्या पुढाकाराने ‘बडीकॉप’ ही संकल्पना सुरू केली आहे. या संकल्पनेनुसार प्रत्येक कॉलेजमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याचे परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी पत्रकार परिषेदत सांगितले. वाकडमध्ये घडलेल्या आमदार कन्येवरील हल्ल्याच्या घटनेविषयी त्यांना विचारले असता त्यांनी ही माहिती दिली.
महाविद्यालयांनी दक्षता घ्यावी
वाकडमध्ये एका विद्यार्थिनीवर तिच्याच वर्गात शिकणार्या एकाने कोयत्याने वार केले. या घटनेत विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी प्रत्येक कॉलेजमध्ये बडीकॉप म्हणजेच पोलिस मित्राची जनजागृती करण्यात येणार आहे. मंगळवारच्या घटनेपूर्वी पीडित मुलीने महाविद्यालय प्रशासनाला तरुणापासून जिवाला धोका असल्याची कल्पना आधीच दिली होती. त्याची दखल महाविद्यालयाने घेतली असती तर हा प्रकार घडला नसता. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे यापुढे आता एखाद्या विद्यार्थिनीने काही तक्रार केली तर महाविद्यालयांनी त्वरित पोलिस प्रशासनाला कळवावे, असे आवाहनही उपायुक्त शिंदे यांनी केले.
काय आहे ‘बडीकॉप’ ग्रुप?
पुणे पोलिसांनी सुरू केलेल्या बडीकॉप संकल्पनेनुसार मुलींचा एक ग्रुप तयार करण्यात येणार आहे. या ग्रुमपमध्ये एक पोलिस कर्मचारी ‘बडीकॉप’ म्हणजेच पोलिस मित्र म्हणून नेमण्यात येणार आहे. एका ग्रुपमध्ये 40 महिलांच्या पाठीमागे साधारण एक पोलिस कर्मचारी (बडीकॉप) असणार आहे. या ग्रुपमध्ये वरिष्ठ पोलिस अधिकारी समाविष्ट असल्याने त्याचा आढावा घेण्यात येईल. प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये किमान 20 बडीकॉपचा ग्रुप तयार करण्यात येणार आहे. तसेच, शहरामध्ये एक हजाराहून अधिक बडीकॉप ग्रुप स्थापन करणार आहे, असेही उपायुक्त शिंदे यांनी सांगितले.