महाविद्यालयांमध्ये रहदारी नियमांसह हेल्मेट आवश्यकतेबाबत पथनाट्यातून जनजागृती

0

जळगाव । शहरातुन जाणार्‍या महामार्गांवर अपघात होवुन मृत्यु होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. तसेच समांतर रस्ते नसणे, सुरक्षित महामार्ग क्रॉसिंग नसणे या बरोबरच रहदारीचे नियम व्यवस्थीत न पाळणे, योग्य ती खबरदारी न घेणे इत्यादी कारणांनी अनेक महाविद्यालयीन तरुण अपघातग्रस्त होत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित रहदारीसाठी व नियमांची जनजागृती व्हावी यासाठी आज जळगाव फर्स्ट व शहर वाहतुक कार्यालयातर्फे मुळजी जेठा महाविद्यालयात जनजागृतीपर अभियान राबविण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून सुरक्षित रहदारी व नियमांची माहिती दिली.

यांची होती उपस्थिती

मुळजी पेठ महाविद्यालयात सकाळी ९ वाजता अभियानास सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, डॉ राजेश पाटील , उद्योगपती साजीद् भाई शेख, होम गार्डचे माजी जिल्हा समादेशक विनोद कोळपकर, एसटीचे कर्मचारी गोपाल पाटील, उप प्राचार्य भारंबे, प्रा. जंगले, प्रा लाभाने, प्रा देवेंद्र इंगळे,जळगाव फर्स्टचे डॉ.राधेश्याम चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे प्रा. जुगल किशोर दुबे यांनी सूत्रसंचालन केले.

या ठिकाणी पथनाट्य सादर

सकाळी मुळजी जेठा महाविद्यालयात चंद्रकांत इंगळे व विकास पवार यांच्या नेतृत्वातील पथकाने हेल्मेटची आवश्यकता, रहदारी नियम यांच्या बद्दलची जागरूकता यावर प्रबोधनकारी पथनाट्य सादर करून उपस्थितांचे माने जिंकली. तसेच अपघातातून कुटूंबियांवर काय संकट येतात हे देखील त्यांनी पथनाट्यातून विद्यार्थ्यांना समजून सांगितले. यानंतर दुपारी १२ ते १ दरम्यान आयएमआर कॉलेज येथे तर दुपारी १ ते २ या वेळात पथनाट्यचा प्रयोग बाहेती महाविद्यालयात झाला. यावेळी डॉ. राहुल मयूर, जमील शेख यांनी मार्गदश केले.

जबाबदार नागरिक घडण्यास मदत

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये रहदारीच्या नियमांविषयी जागृती व्हावी व जबाबदार नागरिक घडण्यास मदत व्हावी या उद्देशाने शहरातील विविध महाविद्यालयात जळगाव फर्स्ट पथनाट्याच्या माध्यमाने महाविद्यालयाच्या परिसरात कार्यक्रम करणार आहे असे डॉ राधेश्याम चौधरी यांनी अभियाना दरम्यान सांगितले. तीन महाविद्यालयात हा उपक्रम राबवला गेला, अशी माहितीही त्यांनी दिली. यातच तरूणांनी हेल्मेटचा कंटाळा न करता त्याचा वापर करून स्वत:हाला सुरक्षित ठेवावा असे मार्गदर्शन करतांना सांगितले.