नंदुरबार । उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, विद्यापीठे, तंत्रशिक्षण संस्था, यांच्या अखत्यारीतील महाविद्यालयात किंवा संस्थेमध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेणार्या व वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या सर्व युवक/युवतींकडून प्रवेश घेतेवेळीच मतदार यादीमध्ये नांव नोंदणी करण्याची प्रक्रिया करण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिल्या आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात नंदुरबार शहरातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व मुख्याध्यापक यांची बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी बोलत होते.उपजिल्हाधिकारी निवडणूक सुधीर खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, तहसिलदार नितीन पाटील उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी पुढे बोलतांना म्हणाले, मतदार नांव नोंदणी कामासाठी सर्व महाविद्यालयांना प्रत्येकी एक नोडल अधिकारी यांची नियुक्ती करावी. 18 वर्षे पूर्ण होत आहेत त्यांनी मतदार नोंदणी करणे अत्यावश्यक आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.