जळगाव । निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हयात 1 ते 31 जुलै दरम्यान प्रथम मतदारांची मतदार नोंदणी करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत 8 व 22 जुलै रोजी विशेष मोहिम राबविण्यात येणार असून शासकीय व खाजगी शैक्षणिक संस्थामध्ये या दिवशी विशेष कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे. सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना मतदार नोंदणीसाठी नोडल ऑफिसर म्हणून नेमण्यात आले आहे. तसेच 18 ते 21 वयोगटातील विद्यार्थ्याकडून महाविद्यालयात प्रवेश देतांनाच मतदार नोंदणी अर्ज भरुन घेण्यात येणार आहे.
मतदारांची अधिकाधिक नोंदणी होण्यासाठी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांचीही मदत घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर तरुण मतदारांसाठी शैक्षणिक संस्थांमधील वसतीगृहांमध्ये विशेष शिबिरे भरविण्यात येणार आहे. अपंगाकरिता विशेष मोहिम हाती घेऊन त्यांच्या लोखसंख्येइतकी नोंदणी करण्यात येणार आहे. या मोहिमेच्या कालावधीत बीएलओ घरोघरी जाऊन नमूना 6 भरुन घेणार आहे. राष्ट्रीय कर्तव्याच्या भावनेने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले आहे. मतदार नोंदणी करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेचा पूर्वतयारीसंबंधी आढावा घेण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. मोहिमेचा जास्तीत जास्त तरुण मतदारांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आगामी काळात जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुक होणार असून मतदार नोंदणी झाल्यास मतदारांना मतदानाचा हक्क बजाविता येणार आहे.