महाविद्यालयीन मुलीचा विनयभंगप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक

0

मुंबई – वांद्रे येथे भरस्त्यात एका सोळा वर्षांच्या महाविद्यालयीन मुलीचा विनयभंग करुन मोटारसायकलवरुन पळून गेलेल्या दोन आरोपींना खेरवाडी पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. उमेश सिताराम चव्हाण आणि सुनिल हरिश राठोड अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांविरुद्ध विनयभंगासह बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत त्यांना शुक्रवारी विशेष सत्र न्यायालयात हजर केले जाईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी सांगितले. ही घटना 7 जुलैला दुपारी पावणेतीन वाजता वांद्रे येथील खेरवाडी जंक्शनजवळील आरएनए इमारतीच्या कलेक्टर कार्यालयाजवळ घडली होती. सोळा वर्षांची ही मुलगी खार परिसरात राहत असून वांद्रे येथील महाविद्यालयात अकरावीत शिकते.

7 जुलैला दुपारी ती तिच्या तीन मित्र-मैत्रिणीसोबत महाविद्यालयाच्या दिशेने जात होती. दुपारी तीन वाजता ती खेरवाडी जंक्शनजवळ रस्ता क्रॉस करीत असताना तिथे मोटारसायकलवरुन दोन तरुण आले. त्यापैकी मागे बसलेल्या एका तरुणाने तिच्या छातीवर जोरात फटका करुन तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ही मुलगी खाली पडली आणि तिने आरडाओरड सुरु केला. तिथे लोक जमा होताच ते दोघेही मोटारसायकलवरुन पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच खेरवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या मुलीच्या तक्रारीवरुन खेरवाडी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध विनयभंगासह बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. याच गुन्ह्यांत पोलिसांनी 40 हून अधिक संशयितांची चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान उमेश चव्हाण आणि सुनिल राठोड या दोघांची नावे समोर आली होती. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी वांद्रे परिसरातून अटक केली. उमेश हा आठवी शिकलेला असून तो सध्या वांद्रे येथील ज्ञानेश्वर नगरात राहतो. सुनिल हा वाकोला येथे राहत असून तो गुन्ह्यांच्या वेळेस मोटारसायकल चालवित होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोहन कदम व त्यांच्या पथकाने या दोघांनाही अटक केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी सांगितले.