पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्यावतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त कविसंमेलन
पिंपरी चिंचवड ः पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील मराठी विभाग आणि पिंपरी चिंचवड महापालिका, पिंपरी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त कविसंमेलनाचे उद्घाटन महापौर माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना त्यांनी माय मराठीचे महत्त्व विशद करून शाळा-महाविद्यालयांमध्ये भाषा हा विषय अनिवार्य असला पाहिजे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्व विकासाबरोबरच आपल्या भाषिक कौशल्यांचा विकासही यांसारख्या स्पर्धांमधून घडवून आणावा. पिंपरी चिंचवड महापालिका या उपक्रमांसाठी निश्चितच कटिबद्ध राहील, असे मत त्यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांसाठी आगळीवेगळी पर्वणी…
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे होते. कवी संमेलन म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक आगळीवेगळी पर्वणी आहे. नेहमी महाविद्यालयातील विद्यार्थी आपल्या कविता सादर करतात. आज नामांकित कवींबरोबर आपल्या कविता सादर करण्याची संधी विद्यार्थ्यांना यानिमित्ताने उपलब्ध झाली, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. महादू बागूल यांनी केले. या कविसंमेलनात नंदकुमार कांबळे,सुरेश कंक, आय. के. शेख, निशिकांत गुमास्ते, सुभाष चव्हाण, आत्माराम हरे, शरद शेजवळ, शामराव सरकाळे, मधुश्री ओव्हाळ, डॉ. भाग्यश्री कुलकर्णी, माधुरी विधाटे, देवेंद्र गावंडे, राज अहेरराव, अरुण कांबळे तसेच श्रावणी चितारे, भागवत तालिकोटे या नवोदित कवींनी आपल्या कविता सादर केल्या.
भाषा संवर्धनासाठी युवकांची भूमिका महत्त्वपूर्ण… कार्यक्रमाचे समन्वयक अण्णा बोदडे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबरच मराठी भाषेचे संस्कार व संवर्धन करण्यासाठी महाविद्यालयीन युवक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ही बाब लक्षात घेऊन मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त कवीसंमेलन आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन डॉ. माया माईनकर यांनी केले. तर आभार डॉ. अर्जुन डोके यांनी मानले. या कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विभाग प्रमुख डॉ. महादू बागुल, प्रा. सुवर्ण खोडदे यांनी केले.