मुंबई : खासगी महाविद्यालयातील वैद्यकीय, इंजिनियरिंग, आर्किटेक्चर आणि एमबीएसह इतर अभ्यासक्रमांचे शुल्क 20 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय राज्याच्या शुल्क नियामक प्राधिकरणाने घेतला आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून ही फी कपात लागू होणार आहे.
राज्यभरात तीन हजार खासगी महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना वैद्यकीय, इंजिनियरिंग, एमसीए, फार्मसी, एमबीए, हॉटेल मॅनेजमेंट, कायदा, आर्किटेक्चर असे सहा हजार अभ्यासक्रम शिकवले जातात. या अभ्यासक्रमांसाठी लाखो रुपये फी मोजावी लागते. त्यातच प्रथम वर्षानंतर ही फी 7 टक्क्यांपर्यत वाढते. यामुळे अनेक पालकांना मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घ्यावे लागते. या अभ्यासक्रमांची फी कमी करण्याची मागणी पालक आणि विद्यार्थ्यानी राज्य सरकारकडे केली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खासगी महाविद्यालयातील या अभ्यासक्रमांची फी निश्चित करण्यासाठी स्थापन केलेल्या शिक्षण शुल्क समितीत बदल केला. त्यानंतर शुल्क नियामक प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. यात समितीने हा निर्णय घेतला आहे.