तालुका कृषी अधिकार्यांची धाड : बियाणे विक्रीला स्थगिती
जळगाव – येथील विसनजी नगरातील महावीर कृषी केंद्रात बनावट बियाण्यांची विक्री होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आज तालुका कृषी अधिकार्यांनी दुकानात धाड टाकुन तपासणी केली. यावेळी तालुका कृषी अधिकार्यांनी दुकानातील कागदपत्रांसह बियाण्यांच्या स्टॉकची तपासणी करून बियाणे विक्रीला स्थगिती दिली आहे. दरम्यान या कारवाईमुळे बियाणे विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील विसनजी नगरातील ललित वर्धमान लोढा यांच्या मालकिचे मे. महावीर कृषी सेवा केंद्र येथे पपईचे बनावट बियाणे विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आयपी इन्व्हेस्टीगेशन या कंपनीच्या विभागीय व्यवस्थापक संतोषकुमार गांधी (रा. कसबे सुकेणे, ता. निफाड) यांनी या दुकानातुन पपईचे रेड लेडी ७८६ या नावाचे बियाणे घेतले असता ते बोगस असल्याचे आढळुन आले. त्यांनी तातडीने तालुका कृषी अधिकार्यांना बोलावुन दुकानातील मालाची तपासणी करण्याविषयी तक्रार दिली.
दुकानातील साठा जप्त
तालुका कृषी अधिकारी सचिन बर्हाटे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी डी.एम.शिंपी, कृषी पर्यवेक्षक डी.वाय.महाले यांनी महावीर कृषी सेवा केंद्र येथे धाड टाकुन दुकानातील बियाण्यांचा साठा, कागदपत्रे यांची तपासणी करून साठा जप्त केला आहे. तसेच संतोषकुमार गांधी यांच्या तक्रारीवरून बियाणे विक्रीलाही कृषी अधिकार्यांनी तात्काळ स्थगिती दिली. तसेच दुकानाचे मालक ललित वर्धमान लोढा यांची देखिल त्यांनी चौकशी केली.
बियाण्यांचे नमुने तपासणार
सचिन बर्हाटे, तालुका कृषी अधिकारी, कृषी विभाग
कंपनीच्या विभागीय व्यवस्थापकाने दिलेल्या तक्रारीवरून बियाण्यांच्या साठ्याची तपासणी करण्यासाठी साठा जप्त करण्यात आला आहे. यातील बियाण्यांचे काही नमुने घेऊन ते गुणवत्ता नियंत्रण विभागाकडे तपासणीसाठी पाठविले जाणार आहे. त्यात दोष आढळुन आल्यास पुढील कारवाई केली जाईल.