मुंबई: शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन राज्यात महाशिवआघाडीची सरकार स्थापन होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु आहे. दरम्यान ,माजी मुख्यमंत्र्यांनी या आघाडी सरकारबाबत विधान केले आहे. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी तीन पक्षांनी मिळून सरकार स्थापन केल्यास सहा महिने देखील त्यांचे सरकार टिकणार नाही असे सांगत पुन्हा भाजपाचेच सरकार येईल असा विश्वास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज्यात महाशिवआघाडीचे सरकार येऊन ते पाच वर्ष टिकेल असे सांगत त्यांनी महाशिवआघाडीचे संकेत दिले. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे नागपूरमध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असल्याचे सांगत सकारात्मक संकेत दिले आहेत. ‘किमान, समान कार्यक्रम ठरवण्यावर आणि फॉर्म्युलावर सध्या चर्चा सुरू आहे. ठोस निर्णय झाल्यानंतर फॉर्म्युला सर्वांसमोर उघड केला जाईल’ असेही यावेळी शरद पवारांनी सांगितले.
स्थिर सरकार यावे ही आमची सर्वांची इच्छा आहे. राज्यात मध्यवर्ती निवडणुका होणार नाहीत. राज्यात स्थिर सरकारच स्थापन होईल, हे सरकार पाच वर्ष चालेल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू’ असेही पवारांनी सांगितले.