विरोधात राहणारे सतीशअण्णा, देवकर, वाघ, वळवी पेचात
चेतन साखरे
जळगाव – ज्यांच्याविरोधात कायम निवडणुकीच्या रणांगणात कायम लढले, अंगावर केसेस घेतल्या, मतांचा जोगवा मागितला, आज त्यांच्याच सोबत बसावे लागणार की काय? अशी चिंता सध्या जिल्ह्यातील शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांना सतावत आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात महाशिवआघाडी होत असल्याने पारोळा, जळगाव ग्रामीण, पाचोरा आणि चोपडा याठिकाणच्या नेत्यांची चांगलीच गोची होणार आहे. विधानसभा निवडणूकीनंतर राज्यात सत्ता स्थापनेचा पुरता गोंधळ सुरू आहे. मुख्यमंत्री पदावरून शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली असुन या नव्या समीकरणांमुळे अनेकांना तोंडघशी पडावे लागणार आहे. राज्यासह जिल्ह्यांमध्ये देखिल पुढच्या काळात मोठे गंमतीशीर राजकारण बघायला मिळणार आहे. पारंपारिक एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रु असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांची चांगलीच फजिती होणार आहे.
सतीशआण्णा चिमणआबांची हात मिळवणी ?
पारोळा- एरंडोल मतदारसंघातील एकमेकांचे पारंपारिक कट्टर विरोधक असलेले राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाटील व शिवसेनेचे चिमणराव पाटील यांनी आजपर्यंत सर्वच विधानसभेच्या निवडणूका एकमेकांविरोधात लढल्या. त्या लढतांना दोघांनी पराकोटीची टीका देखिल एकमेकांवर केली. या टिकेमुळेच दोन्ही नेत्यांकडील कार्यकर्ते देखिल नेहमीच एकमेकांविरोधात मुठा आवळून होते. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या चिमणराव पाटील यांनी राष्ट्रवादीच्या डॉ. सतीश पाटील यांचा पराभव केला. आता राज्यात होणार्या नव्या महाशिवआघाडीमुळे एखाद्या विषयात सतीशआण्णा चिमणआबांशी हात मिळविणार का? तसेच चिमणआबा सतीश आण्णांना धीर देणार का? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.
एकाच फांदीवर दोन ‘गुलाब’ उमलणार कसे ?
जळगाव ग्रामीण मतदारसंघात एकमेकांवर वैयक्तीक पातळीवर टिका करणारे राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर आणि शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांच्यातुन विस्तवही जात नाही. शिवसेनेच्या गुलाबरावांनी घरकुलवरून देवकरांना चांगलेच टार्गेट केले होते. तर मतदारसंघात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवरून देवकरांनीही सेनेच्या गुलाबरावांवर अनेकदा शरसंधान साधले होते. एकमेकांचे कार्यकर्ते निवडणुकांमध्ये नेहमीच भिडतांना दिसले. आता राज्यात नेत्यांची एकी होणार म्हटल्यावर जळगाव ग्रामीणच्या एकाच फांदीवर दोन ‘गुलाब’ उमलणार कसे? हे एक कोडेच आहे.
पाचोर्यात दोन वाघांचा सामना टळणार
पाचोरा मतदार संघात शिवसेनेचे वाघ आ. किशोर पाटील आणि राष्ट्रवादीचे दिलीप वाघ हे देखिल एकमेकांचे कट्टर प्रतीस्पर्धी, ग्रामपंचायतपासून ते विधानसभेपर्यंतच्या सर्वच निवडणूकांमध्ये या दोन्ही नेत्यांत टोकाचा विरोध बघायला मिळतो. ज्या राष्ट्रवादीशी दोन हात केले आज त्यांचीच मदत घेऊन सत्तेत जात असतांना किशोरआप्पांना देखिल मोठे जिकरीचे ठरणारे आहे. तसेच माजी आ. दिलीप वाघ आणि त्यांचे समर्थक यांच्या मनातही प्रचंड अस्वस्थता आहे. राज्यातील नेत्यांच्या अजब धोरणामुळे पाचोर्यातील सत्तासंघर्षाचा सामना टळणार का? याकडे लक्ष लागणार आहे.
चोपड्यात वळवींचीही अडचण
चोपडा मतदारसंघात शिवसेनेच्या लताताई सोनवणे यांच्याविरूध्द राष्ट्रवादीकडुन निवडणूक लढविणारे माजी आ. जगदीश वळवी यांची देखिल नव्या सत्ता समीकरणांमुळे मोठी अडचण होणार आहे. शिवसेना सत्तेत बसल्यानंतर त्यांची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम निवडणुकीत विरोधक राहीलेल्या वळवींना करावे लागणार आहे.
एकुणच जिल्ह्यातील पारोळा, जळगाव ग्रामीण, पाचोरा आणि चोपडा या मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची राज्यातील नेत्यांनी चांगलीच गोची केली आहे. राज्यात भाजपा-सेना युती असतांना जळगाव जिल्ह्यात मात्र हे दोन्ही पक्ष नेहमीच एकमेकांविरोधात राहीले. आता देखिल राज्यात महाशिवआघाडी होत असतांना जिल्ह्यात मात्र हे धोरण पाळले जाणार का? हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.