पुणे : देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग श्री भीमाशंकरमध्ये महाशिवरात्रीच्या यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या शुक्रवारी महाशिवरात्र असून, त्या दिवशी भीमाशंकराच्या दर्शनासाठी राज्यातून लाखो भाविक येथे येणार असल्याने त्यांच्यासाठीच्या सोयीसुविधांचाही आढावा घेतला जात आहे.
राज्यात पाच ज्योतिर्लिंगे असून, त्यांपैकी भीमाशंकर हे पश्चिम महाराष्ट्राचे वैभव वाढविणारे तीर्थक्षेत्र आहे. पुणे, रायगड व ठाणे जिल्ह्याच्या हद्दीवर सह्याद्रीच्या कुशीत हिरव्यागार वृक्षांनी पसरलेल्या पर्वतरांगांमध्ये हे तीर्थक्षेत्र वसले आहे. भीमाशंकरचे मंदिर कोरीव काळ्या दगडात बाराव्या शतकाच्या मध्यकाळात बांधलेले आहे. मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीची असून, येथूनच भीमा नदीचा उगम झाला आहे. भीमाशंकर परीसरात अनेक ऐतिहासिक वास्तूही आहेत. मंदिराबाहेर असलेली पोर्तुगीज काळातील घंटा, गोरक्षनाथ मंदिर, कमलजादेवी मंदिर, शनी मंदिर ही प्राचीन मंदिरे येथे आहेत. महाशिवरात्रीनिमित्त देवस्थानने जोरदार तयारी केली आहे. शुक्रवारी यात्रेनिमित्त एसटीच्या जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. आरोग्य सुविधा, दर्शनबारी, पाणी पुरवठा अशा अनेक गोष्टींची तयारी करण्यात आली आहे. यावर्षी यात्रेला पोलिस विभागाकडून जास्त पोलिस बंदोबस्त मिळणार नसल्याने देवस्थानच्या सुरक्षारक्षकांवर व होमगार्डवर भार येणार आहे.भीमाशंकरला याच दिवशी पारंपरिक बाजार भरतो. यात्रेत जुन्या पद्धतीने अजुनही व्यवहार चालतात. डिंक, मध, कडधान्य, औषधी वनस्पतींची खरेदी- विक्री होत असते. या बाजारात खरेदी- विक्रीसाठी कोकणातून लोक येतात. या बाजारासाठी कोकणकड्याजवळ दुकाने लागली आहेत.