‘महाश्वेता’ कादंबरीवर आधारित नृत्य, नाट्य अन् संगीताचा अविष्कार

0

पुणे : स्त्री म्हणून वाट्याला येणारी दु:ख, त्यात असलेली एखादी शारीरिक व्याधी आणि सामाजिक चौकटीतील प्रथा परंपरांचे जाच या सगळ्याशी लढा देऊन सक्षमपणे उभ्या राहणार्‍या एका कणखर स्त्रीच्या सक्षमीकरणाचा अनोखा प्रवास रसिकांनी नृत्य, नाट्य, गीत आणि संगीताच्या माध्यमातून अनुभवला. निमित्त होते; येथील भारतीय विद्याभवन आणि इन्फोसिस फाउंडेशनतर्फे सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमाअंतर्गत आयोजित ज्येष्ठ लेखिका आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा मुर्ती यांच्या ‘महाश्वेता’ या कादंबरीवर आधारित ‘महाश्वेता’ या अनोख्या कार्यक्रमाचे. हा कार्यक्रम कलासक्त ग्रुप, पुणे यांनी सादर केला. यावेळी भारतीय विद्याभवनचे संचालक आणि मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे उपस्थित होते.

नृत्य, नाट्य, गीत आणि संगीताचा मिलाफ असलेल्या या कार्यक्रमात भरतनाट्यमच्या माध्यमातून रसिकांनी ’महाश्वेता’ कादंबरीचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमासाठी खास गीतरचना तयार करण्यात आल्या असून त्याला साजेशा संगीताची जोड देण्यात आली होती. स्त्री सक्षमीकरणावर सामाजिक भाष्य करणार्‍या या कादंबरीचे कथानक या कार्यक्रमातून तितक्याच ताकदीने मांडण्यात आले. ज्येष्ठ नृत्यगुरू माणिक अंबिके यांच्या शिष्या स्मिता सोमण, प्रमद्वरा कित्तूर, गौरी दैठणकर, अर्चना पुरंदरे, रचना कापसे, गौरी देशपांडे, रसिका गुमास्ते, सुवर्णा बाग आणि मेघना साबडे या गुरूभगिनींनी हा कार्यक्रम सादर केला.