प्रचंड बहुमताच्या जोरावर भाजपाने सत्ताधार्यांनी केला ‘खेळखंडोबा
सव्वा वर्षात तब्बल 20 वेळा आणि मे महिन्यात तीन वेळा तहकुब : विरोधकांकडून संताप व्यक्त
पिंपरी-चिंचवड : महापालिकेतील सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर सर्वसाधारण सभा तहकूब करण्याचा ‘लाजीरवाणा’ विक्रम केला आहे. सव्वा वर्षात तब्बल 20 वेळा महासभा तहकूब केली आहे. मे महिन्याची सभा तहकूब करण्याची तर ’हॅटट्रीक’च केली आहे. यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका केली. सत्ताधार्यांच्या अशा बेजबाबदार वर्तणुकीमुळे शहराच्या विकासाला खीळ बसत असल्याचाही आरोप केला. तसेच राष्ट्रवादीची सत्ता असताना सभा तहकूब केली की भाजपचे नगरसेवक आरोप करत होते. आता स्वत: वारंवार सभा तहकूब करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित गव्हाणे यांनी केला.
वारंवार तहकुबीचा सपाटाच
शहरातील विकासकामांचे नियोजन करणे. त्यावर सांगोपांग चर्चा करण्यासाठी महिन्यातून एखदा महासभेचे आयोजन केले जाते. परंतु, सत्ताधारी भाजपने गेल्या सव्वा वर्षात तब्बल 20 वेळा महासभा तहकूब करण्याचा विक्रम केला आहे. महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता जाऊन फेब्रुवारी 2017 मध्ये भाजपची एकहाती सत्ता आली. सत्तांतर झाल्यानंतर महापौर निवडण्यासाठी 14 मार्च 2017 रोजी पहिली महासभा झाली. नियमाप्रमाणे पहिली महासभा तहकूब करण्यात आली. परंतु, त्यानंतर वारंवार सभा तहकूब करण्याचा सपाटाच सत्ताधार्यांनी लावला. 20 जून 2017 ची महासभा तहकूब केली. 20 सप्टेंबर 2017 ची महासभा 16 ऑक्टोबर 2017 पर्यंत तहकूब करण्यात आली. 20 नोव्हेंबर 2017 ची महासभा 28 नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली.
या पहा तारखा
20 डिसेंबर 2017 ची महासभा दोनदा तहकूब करण्यात आली. 20 जानेवारी 2018 आणि 5 फेब्रुवारी 2018 अशी दोनवेळा तहकूब करण्यात आली होती. तर, 20 जानेवारी 2018 ची महासभा 5 फेब्रुवारी 2018 पर्यंत तहकूब केली होती. 20 फेब्रुवारी 2018 ची महासभा दोनवेळा तहकूब केली होती. अर्थसंकल्पाची सभा तर सत्ताधार्यांनी तब्बल सहा वेळ तहकूब केली होती. त्यानंतर 19 मे 2018 ची महासभा पहिल्यांदा 11 जून आणि दुसर्यांदा 20 जूनपर्यंत आणि आता ही सभा 22 जूनपर्यंत तहकुब करण्यात आली आहे. तहकूब केली. अशाप्रकारे भाजपने 20 वेळा महासभा तहकूब केल्या आहेत. सव्वा वर्षात 188 ठराव करण्यात आले आहेत. मे महिन्याची सर्वसाधारण सभा सलग तीन वेळा कोणतेही सबळ कारण न देता तहकूब केली आहे. 19 मे 2018 ची महासभा पहिल्यांदा 11 जून आणि दुस-यांदा 20 जूनपर्यंत तहकूब केली. त्यानंत 20 जून रोजी पुन्हा 22 जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
तहकुबीमागचा हा आहे डाव
सत्ताधार्यांनी महासभा तहकुबीचा पायंडा चांगला जपला आहे. आहे. किरकोळ कारणे पुढे करत वारंवार महासभा तहकूब केली जात आहे. यामुळे शहराच्या विकासाला खिळ बसत आहे. वारंवार सभा तहकूब होत असल्याने महासभेत शहरातील विकास कामांवर चर्चा होत नाही. एकापाठोपाठ एक महासभा तहकूब करून विषयांची साठवणूक करायची आणि अनेक विषय एकाच महासभेत ठेऊन विनाचर्चा मंजूर करून घ्यायचे हा महापालिकेत प्रघातच बनला आहे. अशा वेळी विषयांच्या गर्दीत अनेक वादग्रस्त प्रकरणेदेखील विनाचर्चा मंजूर होऊन जातात.
आता मे, जूनच्या सभा होणार शुक्रवारी!
भय्यु महाराज , काश्मिरमधील शहिद जवानांना श्रद्धांजली वाहून मे महिन्याची सर्वसाधारण सभा 22 जूनला दुपारी दोन वाजेपर्यंत तर जून महिन्याची मासिक सभा 22 जुनला दुपारी तीन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही तहकूब सभा शुक्रवारी होणार आहेत.