महासभा तहकूब; विरोधक खवळले!

0

भ्रष्टाचारामुळे घाबरलेल्या भाजपने महासभा तहकूब केल्या : योगेश बहल

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा शनिवारी आयोजित केल्याचे कळवूनही ही महासभा तहकूब करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाला घ्यावा लागला. यशदा येथील कार्यशाळेला जवळपास 40 नगरसेवक गेल्याने ही सभा तहकूब करावी लागली, अशी माहिती सभागृह नेते एकनाथ पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. तर सभा तहकूब केल्यामुळे विरोधकांनी मात्र भाजपवर जोरदार टीकास्त्र डागले. महापालिकेत दररोज उघड होणार्‍या भ्रष्टाचारामुळे भाजप घाबरले आहे. या भ्रष्टाचाराविरोधात विरोधकांनी आवाज उठवू नये, यासाठी सत्ताधार्‍यांनी जाणिवपूर्वक सलग दोनवेळा महासभा तहकूब केली, असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी केला. महासभाच तहकूब होत असल्याने शहरातील विकासकामे रखडली आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. दुसरीकडे, शिवसेनेने केलेल्या 90 कोटींच्या आरोपांची री ओढत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

योगेश बहल म्हणतात, सत्ताधारी घाबरलेत!
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या डिसेंबर 2017 आणि जानेवारी 2018 या दोन महिन्यांच्या सर्वसाधारण सभेचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी डिसेंबरची सभा कोणतेही सबळ कारण न देता सत्ताधारी भाजपने तहकूब केली होती. त्यामुळे डिसेंबर व जानेवारी अशा दोन्ही महिन्यांच्या महासभा शनिवारीच घेण्यात येणार होत्या. परंतु, ही महासभा अचानक रद्द करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. आता 5 फेब्रुवारीरोजी या दोन्ही सभा एकत्रित घेतल्या जातील, असे सांगण्यात आले. प्रशासनाच्या या निर्णयाने विरोधी पक्ष चांगलेच खवळले. प्रसारमाध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते योगेश बहल म्हणाले, की महापालिकेतील भ्रष्टाचाराची विविध प्रकरणे उघडकीस येत आहेत. त्यामुळे सत्ताधारी चांगलेच घाबरले आहेत. आपला आणखी भ्रष्टाचार चव्हाट्यावर येवू नये. यावरून महासभेत विरोधकांनी आपले आणखी वाभाडे काढू नये, यामुळे सत्ताधारी भाजपनेच आजची महासभा तहकूब केली आहे. त्यामुळे शहराच्या विकासकामांविषयीचे धोरणात्मक निर्णय लांबणीवर पडले आहेत, असेही बहल यांनी सांगितले.

भारतीय राज्यघटनेच्या 73 व 74व्या घटनादुरुस्तीला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी यशदामध्ये कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला महापालिकेचे जवळपास 40 नगरसेवक गेले होते. त्यामुळे ही महासभा तहकूब करण्याशिवाय पर्याय नव्हता. 5 फेब्रुवारीला दोन्हीही महासभा एकत्रित घेतल्या जाणार आहेत.
– एकनाथ पवार, सभागृह नेते

शिवसेना-राष्ट्रवादी भाजपला घेरणार!
शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे व शिवाजीराव आढळराव पाटील यांनी समाविष्ट गावांतील रस्ते व आरक्षण विकासासाठी 425 कोटींच्या खर्चाला मंजुरी देताना 90 कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे, असा खळबळजनक आरोप सत्ताधारी भाजपवर केला होता. त्यानंतर शनिवारीही राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हाच आरोप भाजपवर केला. या भ्रष्टाचारप्रश्‍नी न्यायालयात जाणार आहोत, असा इशाराही वाघेरे यांनी दिला आहे. या कथित भ्रष्टाचारावरून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याने भाजपची चांगलीच गोची झाली आहे. या आरोपांचे पडसाद आगामी सर्वसाधारण सभेतही उमटण्याचे संकेत आहेत. भाजपला घेरण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र आल्याचेही दिसून येत आहे.