महास्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छता रॅली

0

जळगाव । महानगर पालिकेतर्फे शहरातील शाळांना स्वच्छता रॅली काढण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शनिवारी शहरातील 89 शाळांमधील 981 शिक्षकांसह 26 हजार 351 विद्यार्थ्यांनी सकाळी 9 ते 10 या दरम्यान या रॅली काढून आपपल्या परिसरात स्वच्छेविषयी जनजागृती रॅली काढली.

इकरा शाहीनतर्फे स्वच्छता रॅली
इकरा शिक्षण संस्था संचलीत इकरा शाहीन उर्दू हायस्कूमध्ये शहर महानगरपालिकेतर्फे महास्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आला. अभियानानिमित्त शनिवारी 14 रोजी स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले. शहरातील शाळा परिसरात यावेळी स्वच्छता करण्यात आली. रॅलीद्वारे नागरिकांना परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संदेश देण्यात आला. रॅलीत चारशे विद्यार्थ्यासह शिक्षकांनी सहभाग नोंदविला.

के.के. हायस्कूल स्वच्छता अभियान
महास्वच्छता अभियानासंबंधी जनजागृती व प्रबोधन करण्यासाठी शहरातील के.के.उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजतर्फे शनिवारी 14 रोजी स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीचे उद्घाटन मुख्याध्यापिका शमिम मलिक यांच्याहस्ते करण्यात आले. इस्लामपुरा, चौबे शाळा, सुभाष चौक, घानेकर चौक, बळीराम पेठ, शनिपेठ, भिलपूरा परिसरातून रॅली काढण्यात आली. रॅलीत चारशे विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.

घोषणांनी परिसर दणाणले
शहरातील 89 शाळांनी आज स्वच्छता जनजागृती रॅली काढली. सकाळी नऊ ते दहा या वेळेत निघालेल्या रॅलीद्वारे विद्यार्थ्यांनी स्वच्छतेच्या घोषणांनी शाळा परिसर दणाणले. लक्ष वेधणार्‍या रॅलीत विद्यार्थ्यांनी मनपाच्या स्वच्छता यंत्रणेची घंटागाडी जीपीएस प्रणाली, मोबाईल ऍप्सद्वारे तक्रार या यंत्रणेच्या देखील नागरिकांमधे जनजागृती केली.
शाळांनी आपआपल्या परिसरात सकाळी 9 ते 10 वाजे दरम्यान या रॅली काढल्यात. विद्यार्थ्यांच्या हातात ‘स्वच्छता शिका, आरोग्याला जिंका’ ,‘गाडगेबाबाला मानूया, स्वच्छतेला जपूया’, ‘दररोज काढा केर, विषाणू करा ढेर’, ‘स्वच्छता असे जेथे,आरोग्य वसे तेथे’, ‘क्लीन सीटी, जळगाव सीटी’, ‘गली गली मे एकही नारा, स्वच्छ सुंदरा, जलगाव हमारा’ अशी घोषवाक्ये लिहलेले फलक होते. तसेच विद्यार्थी घोषणाही देत होते. हे फलक जळगावकरांचे लक्ष वेधून घेत होते.

या शाळांनी घेतला स्वच्छता रॅलीत सहभाग : मानव मंडळ संचालित प्राथमिक विद्या मंदिर, भा. का. लाठी विद्यामंदिर, रत्ना जैन प्राथमिक विद्यालय, महाराणा प्रताप विद्यालय, के. के. उर्दू गर्ल्स हायस्कूल, प्रेमाबाई जैन उर्दू प्राथमिक शाळा, अभिनव विद्यालय, आनंदरामजी बाहेती हायस्कुल, क्रीडा रसिक एज्युकेशन सोसायटी संचालित प्राथमिक विद्यालय, नविन माध्यमिक विद्यालय, बालनिकेतन विद्यामंदिर, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, विद्या इंग्लिश मीडियम स्कूल आदी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर देशात व राज्यात स्वच्छ भारत व महाराष्ट अभियानानांतर्गत शासनाने अनेक योजना सुरु केल्या आहेत. त्याअतंर्गत जळगावात देखील स्वच्छता अभियान राबवून जळगाव शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे.

प्रशासनाने दैनदिन स्वच्छतेच्या कामात सुधारणा केली आहे. जळगावातील कचरा संकलन करणार्‍या वाहनांमध्ये जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. तर स्वच्छतेचे महापालिकेने स्वतंत्र अ‍ॅप तयार करुन त्या माध्यमातून जळगावकरांच्या तक्रारी मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. प्रशासनाच्या या प्रयत्नांसोबतच जळगावकरांचा देखील या स्वच्छता अभियानात सहभाग घेण्यासाठी दुसर्‍या टप्प्यावर काम सुरु करण्यात आले. संपूर्ण जळगाव शहरात विद्यार्थ्यांच्या स्वच्छता प्रबोधन रॅली काढण्यात आल्यात.