महिंद्राने जिंकला शिवसेनाप्रमुख चषक

0

मुंबई । महिंद्राने अंकुर स्पोर्ट्स क्लब व डॉ. शिरोडकर विचार अमृतधारा आयोजित कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळवत संघातील वरिष्ठ खेळाडू विलास जाधवला 50व्या वाढदिवसाची अनोखी भेट दिली. महिंद्राचे हे या मोसमातील पाचवे जेतेपद, तर मुंबईतील तिसरे. 55किलो वजनी गटात हा मान विजय बजरंग व्यायाम शाळेने मिळवला. महिंद्राचा अभिषेक भोजने व्यावसायिक गटात, तर विजय बजरंगचा गणेश तुपे वजनी गटातील स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले.

लालबाग गणेश गल्ली येथील स्व. अनिल कुपेरकर क्रीडांगणावर झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात महिंद्राने युनियन बँकेचे आव्हान 32-25 असे मोडून काढत रोख 51 हजार रुपये व शिवसेना प्रमुख चषक आपल्या नावे केला. उपविजेत्या बँकेला चषक व रोख 31 हजारांवर समाधान मानावे लागले. महिंद्राच्या अभिषेक भोजनेची पकड करत बँकेने सुरुवात तर झोकात केली. अजिंक्य कापरेने चढाईत एकदा एक व नंतर 2गडी टिपत बँकेची आघाडी वाढवली. ओमकार जाधवने चढाईत बोनस अधिक एक गडी टिपत महिंद्राचे खाते उघडले. पण 9व्या मिनिटाला अजिंक्य कापरेने शिलकी 2गडी टिपत महिंद्रावर लोण देत बँकेला 11-04 अशी आघाडी मिळवून दिली.

पण ती फार काळ टिकली नाही. महिंद्राने 17व्या मिनिटाला या लोणची परत फेड करत 14-14अशी आपल्याकडे आघाडी खेचून आणली. येथून महिंद्राने मागे वळून पाहिले नाही. मध्यांतराला 18-15 अशी महिंद्राकडे आघाडी होती. मध्यांतरानंतर 14व्या मिनिटाला आणखी एक लोण देत महिंद्राने 29-21 अशी आघाडी घेत बँकेच्या गोटातील हवाच काढून घेतली. महिंद्राकडून अभिषेक भोजने, स्वप्निल शिंदे, तर बँकेकडून अजिंक्य कापरे, नितीन भोसले यांनी सर्वांगसुंदर खेळ केला. स्व. भालचंद्र सावंत क्रीडांगणावर झालेल्या 55 किलो वजनी गटात विजय बजरंग व्या.