वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील कान्हे येथील महिंद्रा सीआयई कंपनीचा सव्वा कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे कारण सांगून एक जानेवारी पासून 195 कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केले आहे. कामगारांमध्ये निर्माण झालेला असंतोष लक्षात घेऊन तहसीलदार रणजीत देसाई यांनी सोमवारी तहसील कार्यालयात कंपनीचे अधिकारी कामगारांचे प्रतिनिधित्व करणार्या महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे प्रतिनिधी कामगारांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. लेबर ऑफिसर आर. जी रुमाले, पोलिस निरीक्षक प्रदीप काळे, कंपनीचे एचआर प्रमुख विद्याधर भोंगे, फॅक्टरी मॅनेजर प्रमोद मंत्रवादी, निवृत्ती सावे, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर, चिटणीस केतन नाईक, मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळस्कर, अक्षय पनवेलकर, अक्षय पखडी आदीसह ठेकेदार व कामगार उपस्थित होते.
मनसे संघटने कामगारांवरच कारवाई
कंपनीतील उत्पादन कमी झाल्याने तसेच सव्वा कोटी रुपयांचा तोटा झाल्याने हंगामी कामगारांना तात्पुरते कमी केले आहे. ट्रेनिंग कामगारही कंपनीत मोठ्या प्रमाणात आले आहेत, अशी माहिती कंपनीच्या अधिकार्यांनी बैठकीत दिली. यावेळी राजेश उज्जैनकर यांनी सांगितले की, कंपनीने सव्वा कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे कारण सांगून कामगारांना कामावरून कमी केले आहे. परंतु अशी कारवाई करण्यापूर्वी बॅलन्स शीट सादर केलेले नाही. कामगारांना कमी करण्यापूर्वी ले ऑफसाठी असणार्या कायदेशीर बाबीची पूर्तता केलेली नाही. कंपनीने मनसे कामगार संघटनेचे सदस्य असलेल्या कामगारांवरच आकसाने कारवाई केली आहे. इतर संघटनेच्या कोणत्याही कामगारांना तसेच व्यवस्थापकीय कामगारांना कमी केले नाही.
आंदोलनाचा मनसेचा इशारा
मनसेचे तालूकाअध्यक्ष रुपेश म्हाळस्कर यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरापासून कामगारांवर अन्याय होत होता. त्यामुळे कामगारांनी कंपनीत मनसे संघटनेची स्थापना केली. येथील औद्योगिक विकासात स्थानिकांनी मोठा त्याग केलेला आहे. परंतु त्यांना डावलून बाहेरच्या लोकांना रोजगार दिला आहे. स्थानिक कामगार टिकला पाहिजे अशी आमची भूमिका असून त्यासाठी सहकार्याची तसेच वेळप्रसंगी कंपनीतून संघटना काढून घेण्याची आमची तयारी आहे. परंतु कामगारांना न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
तहसिलदारांनी शनिवारी बोलविली बैठक
तहसीलदार देसाई म्हणाले की, कंपनीतील स्थानिक कामगारांना असे वार्यावर सोडता येणार नाही कंपनीने स्थानिक कामगारांचा सहानभूतीपूर्वक विचार करून त्यांना पुन्हा कामावर घ्यावे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. येत्या तेरा तारखेला पुन्हा बैठक घेण्याची सूचना त्यांनी दिली. तत्पूर्वी वरिष्ठांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन त्यांनी केले.