महिनाभरात 15 बालगुन्हेगार ताब्यात

0

खुनासोबतच इतर गुन्ह्यांतही सहभाग

पुणे : एकीकडे पुणे पोलिसांकडून शहर बालगुन्हेगारी मुक्तीसाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे शहरात बालगुन्हेगारांची दहशत दिसत आहे. गेल्या काही घटनांमध्ये बाल गुन्हेगारांचा सहभाग सर्वाधिक असून, त्यांनी निर्दयीपणे गुन्हे केल्याचे समोर आले आहे. एका महिन्यात खुनासोबतच इतर गुन्ह्यांत 15 बाल गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामुळे कुख्यात आणि सराईतांपेक्षा अल्पवयीन गुन्हेगार (विधी संघर्षित बालक) पोलिसांची डोकेदुखी ठरत आहेत. शहरात जानेवारी महिन्यात तब्बल 12 खुनांच्या घटना घडल्या आहेत.
तर, वाहन जाळपोळ व तोडफोड सत्र सुरूच आहेत. किरकोळ भांडणातही बालगुन्हेगार कोयत्याने हल्ला करून दहशत माजवत आहेत. खुनाच्या घटनांत पोलिसांनी 10 अल्पवयीन मुलांना पकडले आहे. त्यांनी निर्घृणपणे खून केले आहेत. सिंहगड रोड परिसरात चौघांनी तरुणाच्या चेहर्‍यावर अनेक वार केले होते. तर, अलंकार परिसरातही खूनही अल्पवयीन मुलानेच केला आहे. धक्कादायक म्हणजे खून करण्यापूर्वी ‘येरवडा कमिंग सून’ असे व्हॉट्स अ‍ॅपवर स्टेटस ठेवले होते. तर, सोमवारी रात्री जनता वसाहत व सातारा रस्ता परिसरात झालेल्या कोयतेधारकांच्या राड्यातही पाच अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे.

तीन वर्षात 1 हजार अल्पवयीन मुले

गेल्या तीन वर्षार्ंत विविध गुन्ह्यांत 1 हजार अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. तर, 2018मध्ये विविध गुन्ह्यांत 340 अल्पवयीन मुलांचा सहभाग होता. बाल गुन्हेगारांच्या गुन्ह्यातील वाढत्या सहभागामुळे पोलिसांनी विशेष बाल सुरक्षा पथकाची स्थापना केली आहे. पथक स्थानिक पोलिसांसोबत या मुलांचे समुपदेशन, पालकांना मार्गदर्शन करून त्यांच्या अडचणी सोडविण्याचे काम करीत आहे. एकीकडे या मुलांसोबत बैठका सुरू असताना दुसरीकडे बालगुन्हेगारीचा आलेख वाढत असल्याचे चित्र आहे. पाकिटमारी, छोट्या हाणामार्‍या अशा छोट्या गुन्ह्यांतून या मुलांची भीड चेपून ते मोठे गुन्हे करायला धजावत आहेत. त्यामुळेच या पहिल्याच पायरीवर त्यांना समुपदेशन, सुरक्षित वातावरण आणि शिक्षणाची ओळख मिळाली तर गंभीर गुन्हेगार म्हणून त्यांची वाटचाल थांबवणे शक्य आहे. मात्र, त्यासाठी पोलिस, बालकल्याण समिती, प्रशासन, सरकार, सामाजिक संस्था या सार्‍या पातळ्यांवर एकत्रितपणे समुपदेशनासह बालमन जाणण्याची प्रक्रिया सुरू झाली तर अनेक मुले गुन्हेगारीच्या वाटेवरून परत फिरण्याची आशा आहे.