आयटीआयजवळ ट्रॅव्हल्सने नशिराबादच्या महिलेला चिरडले ; दुचाकीस्वार वृध्द पतीही जखमी
जळगाव : महामार्गावरील खड्डा चुकविण्याच्या नादात भरधाव खासगी ट्रॅव्हल्स बसने समोरुन येणार्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने मरीयमबी शेख हनीफ (65, रा.नशिराबाद) ही वृध्द महिला जागीच ठार झाली, तर दुचाकीस्वार त्यांचे पती हनीफ शेख करीम हे गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी महामार्गावर आयटीआय समोर घडली. दरम्यान याच खड्डा चुकवितांना कंटेनरच्या धडकेत जखमी झाला होवून बालंबाल बचावला होता. महिनाभरानंतर याच खड्ड्याने वृध्द महिलेचा बळी घेतला आहे. खड्डा बुजविण्यात आला असता, तर आजच्या अपघात होवून महिलेचा जीव गेला नसता, अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत नागरिकांनी अपघात स्थळी महापालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधींवर रोष व्यक्त केला.
महिनाभरापूर्वीच हज यात्रा करुन परतले होत दाम्पत्य
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हनीम शेख हे पत्नी मरीयमबी यांच्यासह शनिवारी दुचाकीने (क्र.एम.एच.19 ए.वाय.556) नशिराबाद हून पिंप्राळा येथे नातेवाईकाकडे साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गेले होते. तेथून परत येत असताना महामार्गावर शासकीय आयटीआयनजीक जळगाव शहराकडून धरणगावमार्गे चोपडा जाणार्या ‘श्री मनुश्री’ या ट्रॅव्हल्स बसने (क्र.एम.एच.12 ए.के.5262) खड्डा चुकविण्याच्या नादात थेट शेख दाम्पत्याच्या अंगावर ट्रॅव्हल्स आणली. यात मागे बसलेल्या मरीयम बी तोल जावून महार्गावर पडल्या. व ट्रॅव्हल्सने त्यांना चिरडले, तर पती शेख करीम हे गंभीर जखमी झाले. हा अपघात झाल्याचे लक्षात येताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून मृत मरीयमबी यांना जिल्हा रुग्णालयात हलविले तेथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केले. महिनाभरापूर्वीच दाम्पत्य हज यात्रेवरुन परतले होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.
महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
पती करीम शेख यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांचीही प्रकृती चिंताजनक आहे. अपघातानंतर नागरिकांनी रुग्णवाहिकेला फोन केला, मात्र क्रमांक बंद होते, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली मात्र रुग्णवाहिका उशीराने पोहचली. तोपर्यंत पती हनीफ पत्नी मरीयमबी याचे डोके मांडीवर धरुन हंबरडा फोडत होते. मन हेलावणार्या दृश्यामुळे इतरांचेही डोळे पाणावले होते. शेख दाम्पत्याचा नशिराबाद येथे किराणा दुकान आहे. त्यांना चार मुले व चार मुली आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुलांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. आईचा मृतदेह पाहून त्यांनी एकच हंबरडा फोडला. अन्य नातेवाईकांनी त्यांना सावरले. अपघातग्रस्त बस पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. ही बस रोज जळगाव-चोपडा या मार्गावर प्रवास करते. दरम्यान अपघातानंतर चालक पसार झाला होता. अपघातामुळे वाहतुकीचा काही काळासाठी खोळंबा झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. माहिती मिळताच महामार्ग पोलीस आसिफ काझी, शाम पवार, कपिल चौधरी, अफजल तडवी यांच्यासह रामानंद तसेच जिल्हापेठ पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
या खड्डयात विद्यार्थी बालंबाल बचावला
गेल्या महिन्यात याच खड्डयात सत्यम राजेंद्र पाटील (18, रा.जागृती हौसिंग सोसायटी,रामानंद) हा विद्यार्थी बालंबाल बचावला होता. भरधाव कंटेनरने सत्यमच्या दुचाकीला जोरदार धडक दिली होती. यात दुचाकीचा चुराडा झाला होता तर सत्यम जखमी झाला होता. नशिब बलवत्तर म्हणून तो या अपघातातून बचावला. महिनाभरानंतरही हा खड्डा जसाचा तसा आहे. हा खड्डा बुजविला असता तर कदाचित या मरीयमबी यांचा जीव गेला नसता.