फैजपूर। शहरातील मिल्लतनगर भागातील प्रमुख गटारीच्या कामाचे घोडे अद्यापही अडलेच आहे. या अर्धवट गटारीचा त्रास परिसरातील रहिवाशांना होत असून अनेक महिन्यांपासून तुंबलेल्या सांडपाण्याच्या तीव्र दुर्गंधीमुळे ते त्रस्त आहेत. याकडे मात्र पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
वर्षभरापूर्वी मिल्लतनगरच्या पश्चिमेस रहिवासी वस्तीमध्ये पालिकेने नगरोत्थान योजनेतून 12 लाख निधी खर्च करून प्रमुख गटारीच्या कामाला सुरुवात केली होती. मात्र, आलेल्या अडचणींमुळे सहा महिन्यांपासून खिरोदा रस्त्यापासून पुढे या गटारीचे काम बंद पडले आहे.
परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य
यामुळे गटारातील सांडपाण्याचा निचरा होण्याऐवजी ते तुंबून राहते. या गटारीतून कचरा वाहून जाण्यास अडचण येत असल्यामुळे हा कचरा गटारींमध्येच अडकून पडतो. त्यामुळे सांडपाणी देखील वाहून जाण्यास अडथळे निर्माण होत असतात, बर्याच वेळा हे पाणी रस्त्यावर येऊन रस्त्यावरच घाण पाण्याचे डबके साचत असते. या पाण्याची तीव्र दुर्गंधीदेखील सुटली आहे. यावर डासांचा प्रादुर्भाव देखील वाढीस लागत असून यातून नागरिकांच्या आरोग्यास बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रहिवाशांची ओरड वाढूनही पालिकेचे दुर्लक्ष कायम आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन गटारींची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी तसेच यात अडकलेला कचरा काढण्याची आवश्यकता आहे.