महिन्याभरापूर्वी सूचना करूनही आरोग्य अधिकारी निष्क्रीयच…

0

जळगाव । महापालिकेच्या स्थायी सभेत शहरात डेग्यूंचे रूग्ण आढळल्याने आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांना धारेवर धरले. ही सभा सभापती डॉ. वर्षा खडके यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय इमारतीच्या 16व्या मजल्यावरील सभागृहात घेण्यात आली. याप्रसंगी उपायुक्त चंद्रकांत खोसे, नगरसचिव अनिल वानखेडे उपस्थित होते. महिन्याभरापूर्वीच शहरातील अस्वच्छतेने साथीचे रोगांची लागण होण्यापूर्वी फॉगींग, अ‍ॅबेटींग करण्याची सूचना मनसेचे नगरसेवक अनंत जोशी यांनी स्थायी सभेत केली होती. मात्र, महिन्याभरानंतरही शहरात अ‍ॅबेटिंग केले जात नसल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांनी शहरात अ‍ॅबेटिंग केले जात असल्याची माहिती दिली. यावर चेतन शिरसाळे यांनी त्यांच्या नातेवाईकाला डेंग्यूची लागण झाली असल्याचे सभागृहाच्या निर्देशनास आणून दिले.

डॉ. पाटील यांची उडाली भंबेरी
अ‍ॅबेटिंग, फॉगींग का करण्यात येत नाही अशी विचारणा केल्यावर डॉ. विकास पाटील यांनी फॉगींग मशिन चालविण्यासाठी माणसे उपलब्ध नसल्याची लंगडी सबब सभागृहात दिली. डॉ. पाटील यांच्या उत्तराने सदस्य संतप्त झालेत. अनंत जोशी यांनी फॉगींग मशिन चालविणे हे काही रॉकेट सायन्सचे काम नसून ते कोणताही कर्मचारी करू शकतो असे डॉ. पाटील यांना सांगितले. शहरात फॉगींग, अ‍ॅबेटिंग सुरू असल्याचा डॉ. पाटील यांनी सांगितल्याने सभापती वर्षा खडके यांनी त्यांना पुरावा दाखल तशी नोंद केलेली डायरी दाखविण्याचे आदेश दिलेत. यावेळी डॉ. पाटील यांची भंबेरी उडाली. डायरी आणली नसल्याचे त्यांनी सभापतींना उत्तर देऊन आपली सुटका करून घेतली. कर्मचार्‍यांची बैठक घेतो असे डॉ. पाटील यांनी सभागृहास सांगितले. आरोग्य विभागाचे कर्मचारी कोठे काम करीत आहेत याची माहिती डॉ. पाटील यांना नसल्याचे नितीन बरडे यांनी आरोप केला. डॉ. पाटील यांनी नेहमी प्रमाणे मिटींग घेतो असे सांगितले. यावर सभापती खडसे यांनी स्थायी समितीची सभा असतांना माहिती घेवून का येत नाही अशी विचारणा केली.

गाडीत कचरा न टाकणार्‍या नागरिकांची यादी तयार करणार
अनंत जोशी यांनी डॉ. पाटील यांच्या मिटींग घेतो या उत्तरावर संताप व्यक्त करत मिटींग घेवू नका काम करा असा दम भरला. आयुक्तांनी प्रत्येक वार्डांत फॉगींग मशिन देण्याचे सांगितले असल्याचे सांगितले. यावर डॉ. विकास पाटील यांनी फॉगिंम मशिन चालविण्यासाठी कर्मचारी नसल्याचे सांगितले. तसेच कचरा संकलन करतांना ज्या घरातून कचरा गाडीत कचरा टाकणार नाही त्यांची यादी तयार करण्याची सूचना पृथ्वीराज सोनवणे यांनी पुन्हा मांडली. यावर डॉ. विकास पाटील यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणणे शक्य नसल्याचे सांगितले. यावर सोनवणे यांनी आदर्श नगरात मी ही संकल्पना यशस्वी करून दाखवू शकतो असे उत्तर दिले.

वॉचमनअभावी साहित्य चोरी
गेल्या तीन महिन्यापासून शिवाजी नगर युनीटमध्ये ड्रायव्हर नसल्याने कामकाज थांबले असल्याचे नवनाथ दारकुंडे यांनी तक्रार केली. वारंवार मागणी करूनही ड्रायव्हर दिला जात नसल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच शिवाजी नगर युनीट येथे वॉचमन नसल्याने तेथील साहित्य चोरीला जात असल्याचेही दारकुंडे यांनी यावेळी सांगितले. साहित्य चोरीला जावूनही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याने दारकुंडे यांनी नाराजी व्यक्त केली. तीन महिन्यांपासून युनीटला ड्रायव्हर का दिला जात नाही याची विचारणा सभापतींनी अस्थपाना विभागाला केली असता अस्थपना अधिक्षक सुभाष मराठे यांनी ड्रायव्हर कमी असल्याचे सांगितले. यावर संतापून सभापती वर्षा खडके यांनी आयुक्तांच्या गाडीचा ड्रायव्हर शिवाजीनगर युनीटला द्या अशी सूचना केली. नवानाथ दारकुंडे यांनी युनीटवर कर्मचारी येत नसल्याचीही तक्रार केली.

अखर्चित निधीबाबत साशंकता
पृथ्वीराज सोनवणे यांनी प्रत्येक युनीटवर थम्ब मशिन बसविण्याचे मागणी केली. कर्मचारी येत नसल्याच्या वृत्ताला सभापतींनी स्वतः दुजोरा दिला. नितीन बरडे यांनी अग्निशमन विभागाकडे निधी उपलब्ध असतांना तो खर्च का करण्यात येत नाही याची विचारणा केली. अग्निशमन विभागाचे स्लम भागात टँकर जावू शकत नसल्याने बुलेट फायटर घेण्याचे सूचना मांडली.

यावेळी पृथ्वीराज सोनवणे यांनी बरडे यांच्या वक्तव्यात हस्तक्षेप करीत मागील 3 वर्षांपासून नितीन बरडे अग्निशमन विभागाच्या अखर्चित निधी बाबत बोलत आहेत. ते सत्ताधारी असतांना त्यांना सभागृहात प्रश्‍न उपस्थित करतात, यातून प्रशासन सत्ताधार्‍यांचे ऐकत नसल्याचे दिसून येत असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. सत्ताधार्‍यांची प्रशासनावर पकड नसल्याचा आरोप केला.

स्मशानभूमी रस्ते अंधारात
शिवाजीनगर येथील स्मशानभूमीवरील रस्त्यांवर लाईट नसल्याने रात्री अंधार राहत असल्याची तक्रार नवनाथ दारकुंडे यांनी केली. विद्युत अभियंता एस. एस. पाटील यांनी उड्डाणपुलाचे काम होणार असल्याने तेथे काम करू शकत नसल्याचे सांगितले. सभापती वर्षा खडके यांनी तात्पुरती सुविधा करण्याची सूचना पाटील यांना केली. यावेळी पाटील यांनी एमएसइबीकडे पाठपुरावा करीत असल्याची माहिती यावेळी दिली.