पुणे : खाजगी शिकवणी घेणार्या शिक्षकाने रस्त्याने जाणार्या महिलांची छेड काढून पाठलाग करत त्यांची छेड काढल्याचा प्रकार येरवडा परिसरात उघडकीस आला आहे. गेल्या दोन वर्षापासून हा प्रकार सुरु होता. एक-दोन नव्हे त्याने चक्क चार महिलांचा पाठलाग केला. तसेच वर्गातील तरुणीला, माझे तुझ्यावर प्रेम असून, तु लग्न कर अन्यथा तुला नापास करेन, अशी धमकीही त्याने दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे.
आनंद जयानंद (वय 54, रा. येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आनंद हा येरवडा परिसरात कॉमर्स तसेच आर्टस शाखेतील मुलामुलींच्या शिकवण्या घेतो. सायंकाळी 6 ते 8 या वेळेत शिकवणी सुरू असते. त्यानंतर तो शिकवणी बाहेर उभा राहून रस्त्याने जाणार्या महिलांकडे वाईट नजरेने पाहून अश्लील इशारे करतो. तसेच, एखादी महिला एकट्या महिलेशी अंधाराचा फायदा घेऊन अश्लील चाळे करत असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. तो गेल्या दोन वर्षापासून असे करत आहे.
दरम्यान, शिकवणीतील एका तरुणीला रस्त्यात अडवून माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्याशी लग्न कर, अन्यथा मी तुला नापास करेन, अशी धमकीही त्याने दिली आहे. फिर्यादी यांना रस्त्याने जाताना सतत असा अनुभव येत असल्याने त्यांनी माहिती काढली. त्यावेळी तो इतर महिलांनाही असेच करत असल्याचे समोर आले. त्यानंतर फिर्यादी व इतर तीन महिलांनी एकत्र येऊन त्याच्या विरोधात येरवडा पोलीसांकडे तक्रार दिली. त्यानूसार, त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक टुले करत आहेत.