हडपसर : विद्यार्थिनी व महिलाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. महिलांवरील अन्याय, अत्याचार, शोषण यांच्यात वाढ होत आहे. यासाठी महिला व विद्यार्थिनींना स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण देऊन शारीरिक व मानसिकदृष्टया सबल करणे, काळाची गरज बनली असल्याचे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रयत शिक्षण संस्थेच्या साधना संकुल व एस. एम. जोशी महाविद्यालयातील विद्यार्थिनींना स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून सुळे बोलत होत्या. चेतन तुपे, सुरेखा ठाकरे, वैशाली नागवडे, डॉ. अरविंद बुरुंगले, अजित अभंग, किसन रत्नपारखी, डॉ. अशोक धुमाळ याप्रसंगी उपस्थित होते.
खासदार सुळे यांनी केली तलवारबाजी
विद्यार्थिनी व महिलांच्या सुरक्षेबाबत खासदार सुळे विविध उपक्रम, योजनांच्या माध्यमातून काम करत आहेत. महिला व विद्यार्थिनी सक्षम व सुरक्षित राहिल्या तरच देशाचे भवितव्य आहे, अशी भूमिका घेऊन त्या काम करतात म्हणून महिला सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचे योगदान मोठे आहे. महिलांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे, असे चेतन तुपे यांनी सांगितले. एस. एम. जोशी कॉलेजच्या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या अभ्यासिकेला भेट देऊन सुळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रशिक्षक महावीर यांनी विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी तलवार हातात घेऊन तलवारबाजी केली. या प्रशिक्षण कार्यक्रमात 500 विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमासाठी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ.अरविंद बुरुंगले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. शकुंतला सावंत यांनी तर अजित अभंग यांनी आभार मानले.