धुळे । विरोधकांनी महिलांच्या आड लपून नथीतून तीर मारण्याचा प्रयत्न चालविला आहे. या माध्यमातून आपली नाहक बदनामी करण्याचा घाट त्यांनी घातला आहे. महिलांच्या आडून आपल्यावर विविध गलिच्छ आरोप करुन माझे आयुष्य बरबाद करण्याचे कटकारस्थान रचण्यात येत आहे. माता भगिनींच्या रक्षणासाठी मी सदैव तयार असतो आणि राहील. माझ्याकडून अशी घोडचूक होणे शक्य नाही, असा खुलासा देवा सोनार यांनी पत्रकान्वये केला आहे.
तक्रारीत काहीही तथ्य नाही
त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सोमवारी दि.24 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकारी, महिला पदाधिकार्यांनी माझ्या संदर्भात गैरसमज करुन पोलीस प्रशासनाकडे गुन्हा नोंदविण्यासाठी तक्रार केली. मोबाईलवर अश्लील संदेश पाठविल्याचा मुद्दा पुढे करुन ही तक्रार करण्यात आली. परंतू, त्या तक्रारीत काहीही तथ्य नाही, असा माझा दावा आहे. कारण, मुळात दि.21 एप्रिल रोजी रात्री 10 ते 11 वाजेच्या सुमारास माझ्या मालकीचा मोबाईल गहाळ झाला होता. त्याबाबत मी स्वतः आझाद नगर पोलिसांत तक्रारी अर्ज दिला आहे. शिवाय आयडिया कंपनीच्या गॅलरीत यासंदर्भात रितसर सिम कार्ड बंद करण्याचे कळविले आहे. असे असतांना माझ्या हरविलेल्या मोबाईलचा गैरवापर करुन राजकीय क्षेत्रातील काही स्वार्थी मंडळींनी माता भगिनींच्या आड लपून माझ्यावर बेछूट आरोप करण्याचा प्रयत्न चालविला आहे.यामुळे माझ्याच परिवारातील माता भगिनींच्या भावना दुखावल्या आहेत.
वाढत्या लोकप्रियतेमुळेच पाय खेचण्याचा डाव
सोनार यांनी म्हटले आहे की, समाजातील अन्याय अत्याचाराविरुध्द खास करुन महिलांच्या सुरक्षिततेसाठी लढण्याकरीता आपला संघर्ष, लढाई नेहमीच राहील. त्यासाठी नेहमीच पुढकार असेल. भले माझ्यावर आणखी काही गुन्हे दाखल झाले तरी बेहतर. आपण कधीही खंडणी मागितली नाही. कुठल्याही व्यापार्याला त्रास दिला नाही. महाविद्यालयीन तरुणी किंवा माता भगिनींची कधीही छेड काढली नाही. गोरगरीबांना त्रास देणार्या आणि महिला-मुलींची छेड काढणार्या रोमिओंना मी कायमच धडा शिकविला आहे. हा प्रकार जर गावगुंडात मोडत असेल तर तो ज्याच्या त्याच्या विचारांचा भाग आहे, असे देवा सोनार यांनी म्हटले आहे. आपण आजवर अन्यायाविरुध्द लढत आलो आहोत. गोरगरीब, माता भगिनींविरुध्द कधीही अन्याय अत्याचार केलेला नाही. याबाबचे माझ्यावर कोणतेच गुन्हे न्यायप्रविष्ट नाहीत. उलटपक्षी शहरातील टवाळखोर, गावगुंड हे जर माता भगिनींना, तरुणींना त्रास देत असतील तर त्यांच्या रक्षणासाठी आपण सदैव धावून जाऊ. माझ्या राजकीय क्षेत्रातील वाढत्या लोकप्रियतेमुळेच माझा पाय खेचण्याचा डाव विरोधकांकडून रचला जात आहे. यामुळे माझी बदनामी सुरु आहे. परंतू, माझ्यावर करण्यात आलेले आरोप सिध्द झाल्यास छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर तमाम धुळेकर माता भगिनींची आपण जाहीर माफी मागू, असे शेवटी देवा सोनार यांनी म्हटले आहे.