महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी रिक्षा चालवणारी महिला चालक वार्‍यावर..!

0

ठाणे । रिक्षातून अनेक महिला प्रवाशांना असुरक्षिततेचा अनुभव आल्याने ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने पुढाकार घेऊन महिला स्पेशल रिक्षाचा सुरू केल्या आहेत. अशा चालक असलेल्या सुनीता मोकाशी यांच्या रिक्षाला धडक देऊन कंटेनरचालक फरार झाला आहे. मात्र, ही रिक्षा पोलीस स्टेशनमध्ये पडून असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. महिला चालक असलेल्या महिला विशेष रिक्षातून ठाण्यातील महिला सुरक्षित प्रवास करू लागल्या आहेत. मात्र, महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी रस्त्यावर रिक्षा चालविणार्‍या महिला रिक्षाचालक मात्र असुरक्षित झाल्याचे चित्र दिसत आहे. तक्रारदार महिला रिक्षाचालकांची साधी तक्रारही पोलिसांनी नोंदवून घेतली नाही. अथक प्रयत्नानंतर तक्रार लिहून घेण्याचे कर्तव्य नौपाडा पोलिसांनी पार पाडले. दिलेली तक्रार न नोंदविता पोलिसांनी वेगळीच तक्रार नोंदवण्याचा प्रताप केल्याचा आरोप पीडीत अपघातग्रस्त रिक्षाचालक मोकाशी यांनी केला आहे. ठाणे प्रादेशिक परिवहनच्या महिला स्पेशल रिक्षाच्या योजनेत ठाण्यातील गृहिणी सुनीता मोकाशी या महिलेने धाडस करत रिक्षा चालकाचा परवाना आणि रिक्षाचा बॅच काढला. कुटुंबाच्या खर्चातून काटकसर करत कर्जावर त्यांनी रिक्षा (एमएच 04 एचझेड 9127) घेतली आणि सबळ होण्याचा प्रयत्न केला. पण अपघातानंतर पोलिसांनी वेगळीच तक्रार लिहून रिक्षाची डागडुजी करून विम्याची रक्कम घेण्यात अडचणी निर्माण केल्या आहेत. नेहमीप्रमाणे आपल्या कामावर आलेल्या सुनीता मोकाशी यांच्या रिक्षाला 10 फेब्रुवारी रोजी नितीन कंपनीचा उड्डाणपूल चढताच कंटेनरने धडक दिल्याने अपघात झाला होता. या अपघात रिक्षा प्रवाशांसह उलटल्याने गंभीर जखमी झालेल्या मोकाशी यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

स्वावलंबी होण्याच्या मार्गावर निघालेल्या सुनीता मोकाशी यांचे मनसुबे पहिल्याच किरकोळ अपघाताने आणि पोलिसांच्या चुकीच्या तक्रार नोंदणीने धुळीस मिळाले. अपघातग्रस्त नवी रिक्षा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत पोलीस ठाण्यातच पडून आहे. पोलिसांनी लिहून घेतलेल्या चुकीच्या तक्रारीमुळे त्या विम्याची रक्कमेपासून वंचित आहेत. चुकीची तक्रारीची नोंद केल्याबाबत त्यांनी पोलीस आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि नौपाडा वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन देऊन व्यथा मांडली आहे.

रिक्षा चालवण्याचा परवाना आणि बॅच पोलीस ठाण्यातून मिळावा म्हणून मोकाशी यांनी नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन देऊन मागणी केली. मात्र अपघात होऊन अद्यापपर्यंत पंधरवडा उलटला, तरीही रिक्षाचालक महिलेला तिचा परवाना आणि बॅच मिळालेला नाही. महिलांना सुरक्षा देण्याची हमी उचलणारे पोलीस एकीकडे महिलांना सुरक्षित केल्याचा दावा करीत आहेत, तर दुसरीकडे नौपाडा पोलिसांच्या प्रतापाने हे चित्र धुळीस मिळाल्याचे दिसत आहे.