जळगाव । समाजात आजही महिलांना दुय्यम स्थान आहे. शैक्षणिक क्षेत्रात ग्रामीण भागातील महिला देखील पुढे येत आहे. ग्रामीण भागातील महिलांना शिक्षणाची संधी दिली गेली पाहिजे त्या स्वतःला नक्की सिद्ध करुन दाखवतील असा विश्वास महाराष्ट्रातील पहिली महिला प्रज्ञाचक्षु आयपीएस अधिकारी प्रांजल पाटील यांनी व्यक्त
केला आहे.
कल्याणेहोळ येथे आयोजित समाजातील कर्तृत्ववान महिलांच्या सत्कार समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. ग्रामपंचायत कल्यानेहोळ व स्व.राजारामदादा पाटील प्रतिष्ठान, सावली फाउंडेशन यांच्यातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, पारोळा न्यायाधीश धर्मसिंग जनकवार , जिल्हा परिषद सदस्य गोपाळ चौधरी, रमेश पाटील, डॉ.आर.आर.पाटील आदी उपस्थित होते. कल्याणेहोळ गावाचा समारंभ समाजासाठी दिशादर्शक आहे. या गावाने आजपर्यंत वेगवेगळे आदर्श घालून दिले आहेत. कर्तृत्ववान महिलांनी सत्काराने प्रेरणा घेऊन कणखर होऊन जिद्दीने पुढे गेले पाहिजे असे प्रतिपादन मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. कल्याणेहोळ गावाची सुपुत्री श्वेता सुधीर पाटील यांची एम.पी.एस.सी. परीक्षेतुन कार्यकारी अभियंता पदी निवड झाल्याने, हडसन येथील संगीता विजयसिंग पाटील यांना पी.एचडी पदवी, निमगाव येथील वृषाली पाटील यांची इस्रो येथे शास्त्रज्ञ पदी निवड तर सुकन्या पाटील याचा आय.आय.टी पवईतर्फे सुवर्णपदक मिळाल्याने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक जयदीप पाटील तर सूत्रसंचालन प्रतीक पाटील यांनी केले. आभार कल्पिता पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीपस्तंभ चे संस्थापक यजुर्वेन्द्र महाजन होते.