महिलांनी काढली आ.गोटेंची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

0

धुळे । शहरातील पांझरा नदी काठी असलेल्या महाकाली मंदिराच्या पाडकामावरुन गुरुवार, 24 रोजी मंदिर बचाव समर्थक महिलांनी आ. गोटेंविरुध्द एल्गार पुकारला. विशेष म्हणजे गुरुवारी आ. अनिल गोटे यांचा वाढदिवस असतांनाच महिलांनी त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा शहरातून काढली. आ. गोटे यांच्या घरासमोरच प्रतिकात्मक अंत्ययात्रेला ‘विसावा’ दिला तर महानगरपालिका गेट समोर संतप्त महिलांनी प्रतिकात्मक अंत्ययात्रेला जोडे मारुन अग्नीडाग दिला. ही घटना शहरात चर्चेचा विषय
ठरली आहे.

आमचा विकासाला विरोध नाही…
‘आमचा विकासाला नव्हे तर मंदिरे पाडण्याला विरोध आहे’ असा नारा या महिलांनी दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने कालीका माता मंदिर आणि शितला माता मंदिर हटविण्याबाबत तीन दिवसांची मुदत देत मंदिर व्यवस्थापनाला नोटीसा दिल्यानंतर तर हा संघर्ष अधिकच टोकाला गेला असल्याचे चित्र आहे. ग.नं. 5 मधील भगव्या चौकापासून तिरडी बांधून महिलांनी खांदा देत प्रतिकात्मक प्रेतयात्रा थेट आमदाराच्याच घरापुढे आणून ठेवली. आ. गोटेंच्या नावाने रडत बोंबलत प्रतिकात्मक पुतळ्याला लाह्या-मुरमुरे वाहिले. तेथून प्रेतयात्रा पुढे मार्गस्थ झाली. वाजागाजा लावलेली व आग्या बनून हातात मडके घेऊन निघालेली खांदेकरी महिलांची ही प्रेतयात्रा पुढे फुलवाला चौक, कराचीवाला खुंटमार्गे महानगरपालिका चौकात गेली. तेथे अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली. खांद्यावर पाण्याचे मडके घेऊन त्याला छिद्र पाडून तिरडीला जलदान करण्यात आले. इतर सोपस्कार पार पडले आणि अखेर त्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या अंत्ययात्रेला हेमलता हेमाडे, डॉ. दीपा नाईक, कल्पना गंगवार, प्रभादेवी परदेशी, नजमा शकील पटेल, आशाबाई पटेल, नंदा माळी, रंजना पाटील, सुनंदा तावडे, मनिषा ठाकूर, सुरेखा पाटील, उषाबाई खोंडे, अनिता साळवे, रुपाली हेमाडे, अरुणा मोरे आदी सहभागी झाल्या होत्या.