पुणे। शहरी असो वा ग्रामीण भागातील महिलांचे आयुष्य प्रत्येक टप्प्यावर खडतर असते. ‘बाईचं आयुष्य पाण्यात…’ हे वाक्य कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील कठीण प्रसंगांवर आधारलेले विदारक सत्य आहे. प्रत्येक महिला ही जिंकण्यासाठी चालते, जरी ती जिंकली नाही, तरी तिने दिलेला लढा हाच तिच्यासाठी खरा विजय असतो, असे सांगत समाजाच्या विविध क्षेत्रात लढा देणार्या स्त्रियांचे रूप ज्येष्ठ समाजसेविका रेणु गावस्कर यांनी उपस्थितांसमोर उलगडले.
कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे यंदाचा लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई स्मृती पुरस्कार वितरण सोहळा एस.एम. जोशी सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा किर्ती शिलेदार, खासदार वंदना चव्हाण, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शिरीष मोहिते, बी.एम. गायकवाड, अॅड. शिवराज कदम जहागिरदार, चंद्रशेखर हलवाई, उल्हास कदम, अंकुश काकडे, अॅड. एन.डी. पाटील, युवराज गाडवे, नंदकुमार सुतार उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्त्या चेतना सिन्हा, सुनिता गायकवाड, क्रीडापटू तेजश्री नाईक यांना यंदाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच यावर्षी मंदिर स्थापनेच्या 121 व्या वर्षानिमित्त ज्येष्ठ सिने-नाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दत्त महाराजांची प्रतिकृती, रुपये 25 हजार रोख, महावस्त्र, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. दत्तमंदिर ट्रस्टच्या संस्थापिका लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्या स्मरणार्थ विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा गौरव यानिमित्ताने करण्यात आला. पुरस्कार सोहळ्याचे यंदा चौथे वर्ष आहे.
रेणु गावस्कर म्हणाल्या, पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी असो किंवा शिक्षणाची ज्योत पेटविणार्या सावित्रीबाई फुले, यांनी दिलेला लढा विसरता येणार नाही. प्रत्येकाचे मन पुलकीत व्हावे, अशा अनेक स्त्रिया भारतात होऊन गेल्या. ते क्षण पुस्तकातून वाचा आणि अंर्तमुख व्हावा, हा विचार इतिहास सांगतो. या स्त्रियांनी लढा दिल्याने आजची स्त्री अभिमानाने जगू शकते, असेही त्या म्हणाल्या.