महिलांनी पाठविला पंतप्रधानांना बांगड्यांचा आहेर

0

सुरक्षा देण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप

पिंपरी : उत्तरप्रदेश येथील उन्नाव आणि जम्मूतील कठुआ येथील मुलींवर घडलेल्या अत्याचारामुळे देशात असंतोषाचे वातावरण पसरले आहे. देशातील महिला, मुलींना सुरक्षा देण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी अपयशी ठरल्याचा आरोप करत पिंपरी-चिंचवडमधील विविध सामाजिक संघटनांनी पंतप्रधानांना गुरुवारी बांगड्यांचा आहेर पाठविला आहे. पिंपरी, खराळवाडी येथील पोस्ट कार्यालयातून संगीता शहा, अंजना गायकवाड, मेघा अठवले या महिलांनी मोदी यांना बांगड्यांचा आहेर पाठविला आहे. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुप, ब्लू पँथर, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, लोकशाही संस्था, रयत विद्यार्थी विचार मंच, ग्राहक हक्क समिती या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

…म्हणून बांगड्या पाठविणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम म्हणाले की, देशात महिला, मुलींची सुरक्षा धोक्यात आली आहे. लहान मुलींवर नराधाम अत्याचार करु लागले आहेत. त्यांना तेथील भाजप सरकार पाठिशी घालत आहे. युपीए सरकारच्या काळात निर्भया घटनेनंतर भाजपच्या स्मृती इराणी यांनी तत्कालीन पंतप्रधानांना बांगड्या घालण्याचा इशारा दिला होता. आता भाजपच्या राजवटीत कठूआ व उन्नाव प्रकरणात स्मृती इराणी यांनी चिडीचुप भूमिका घेतली आहे. त्यामुळे देशातील महिला, मुलींची सुरक्षा धोक्यात आल्याने विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बांगड्या पाठविण्यात आल्या आहेत. या बांगड्या पंधरा दिवसात पंतप्रधान कार्यालयात पोहोचतील.