महिलांनी मोबाईल, टीव्ही या गोष्टी स्वयंपाकघरापासून दूर ठेवावे!

0

आग सुरक्षिततेवर विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन

सांगवी : आज मोबाईलवर बोलत किंवा टीव्हीवरील मालिका बघत बघत स्वयंपाक करण्याचे महिलांमधील प्रमाण खूप वाढले आहे. मात्र, महिलांची ही सवय संपूर्ण घरासाठीच धोकादायक ठरू शकते. कारण मोबाईल किंवा टीव्ही पाहत स्वयंपाक करत असताना दुर्लक्ष होऊन आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महिलांनी मोबाईल आणि टीव्ही या दोन गोष्टी स्वयंपाकघरापासून दूर ठेवाव्यात, असे आवाहन सेफ किड्स फाऊंडेशनच्या अधिकार्‍यांनी दिला.

जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि लिटल फ्लॉवर इंग्लिश व मराठी मीडियम स्कूलमध्ये सेफ किड्स फाऊंडेशनच्या सहयोगाने ‘सेफ किड्स अ‍ॅट होम’ या उपक्रमांतर्गत शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बाठिया, तेजल कोळसे पाटील, भटू शिंदे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.

मोबाईलमुळे दुर्लक्ष होऊ शकते
सेफ किड्स फाऊंडेशनच्या अधिकार्‍यांनी सांगितले, की महिला स्वयंपाक करताना सैल, घोळसर कपडे घालून स्वयंपाक करताना दिसतात. साडीचा पदरही नीट खोचलेला नसतो. एका बाजूला लहान मुलांना कडेवर घेत स्वयंपाक सुरु असतो. दुसरीकडे गॅसची शेगडी सुरु असताना मोबाईलवर बोलणे किंवा मोबाईलवरील रेसिपी पाहून भाजी करणे सुरु असते. तसेच टीव्हीवरील मालिकेकडेही लक्ष असते. यामुळे दुर्लक्ष होऊन घरात आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महिलांनी स्वयंपाकघरात मोबाईल व टीव्हीपासून दूर राहावे.

ज्वलनशील पदार्थ दूर ठेवावेत
किचन कट्ट्यावर मोबाईल, चाकू, आगपेटी, तेलकट कापड ठेवणेही जोखमीचे आहे. मुलांचा हात पोहोचणार नाही, अशा ठिकाणी काडीपेटी आणि लायटर ठेवावा. पाणी तापवायचा रॉड घातलेल्या बादलीपासून लहान मुलांना दूर ठेवावे. जळणार्‍या मेणबत्त्या, डासांच्या उदबत्त्या, तेलाचे दिवे मुलांचा हात पोहोचणार नाही किंवा मुले पोहोचणार नाही, याकडे लक्ष दिले पाहिजे. ज्वलनशील पदार्थांपासून दूर ठेवावेत. याबरोबरच घराला आग लागल्यास काय खबरदारी घ्यावी, याबाबतही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. फटाके उडवतानाही सुती कपडे परिधान करावीत. स्वतःला आग लागल्यास जिथे आहात तिथे थांबा, खाली पडा आणि लोळा. कपड्यांची पेटलेली बाजू भूमीलगत राहील, याची दक्षता घ्यावी. कपड्यांना आग लागल्यास घाबरून पळू नये. पळाल्यामुळे आग भडकू शकते.

ओल्या हाताने विजेच्या उपकरणांना स्पर्श करू नये
आपल्या साथीदाराला आग लागल्यास कोणतेही जाड कापड घेऊन जळणार्‍या भोवती गुंडाळावे. तसेच त्वरित प्रथमोपचार द्यावेत. जखम किरकोळ असेल, तर कोणतीही क्रिम किंवा टुथपेस्ट लावण्याऐवजी भाजलेला भाग 5 ते 10 मिनिटे पाण्याखाली धरावा, म्हणजे जखम चिघळणार नाही. विजेची उपकरणे हाताळतानाही काळजी घेणे गरजेचे आहे. काम झाल्यावर विजेच्या उपकरणांचे बटण बंद करून प्लग काढून ठेवावा. विजेची उपकरणे / बटणे यांच्याजवळ ज्वलनशील पदार्थ ठेवू नये. कोणत्याही उपकरणावर किंवा विजेच्या बटणावर त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक विद्युतभार टाकू नये. ओल्या हातांनी विजेच्या उपकरणांना स्पर्श करू नये, असा सल्लाही यावेळी देण्यात आला.