मोदी विचार मंचाचे राष्ट्रीय उपाध्यक्षांचे प्रतिपादन
रावेत : महिलांना स्वावलंबी होण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा ही योजना अत्यंत उपयुक्त आहे. या योजनेचा लाभ घेऊन स्वतःबरोबर शहराचा विकास करावा. या योजना खूप उपयुक्त आहेत. त्यामुळे महिलांना स्वतःचा विकास साधता येणार आहे. भाजपने सुरू केलेल्या अनेक योजनांपैकी ही एक योजना आहे, असे प्रतिपादन नरेंद्र मोदी विचार मंचाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वासुदेव शर्मा यांनी केले. वाल्हेकरवाडी भोंडवे नगर येथील नंदनवन कॉलनीमध्ये महिलांसाठी आयोजित महिला रोजगार आणि लघु उद्योग या कार्यशाळेत ते बोलत होते.
यावेळी महिला विभाग राष्ट्रीय उपाध्यक्ष अॅड. अंतरा देशपांडे, मानव सेवा विभाग राष्ट्रीय उपाध्यक्ष युवराज गायधनी, आय.टी. सेल राष्ट्रीय उपाध्यक्ष अमेय देशपांडे, मीडिया प्रभारी महाराष्ट्र राज्य शैलेश कांबळे, गो सेवा विभाग राष्ट्रीय उपाध्यक्ष सुधीरचंद्र जगताप, लघु उद्योग पुणे विभाग अध्यक्ष हरिश शुक्ल, महिला विभाग अध्यक्ष पिंपरी चिंचवड अनिता कुंभार आदी उपस्थित होते.
महिलांना स्वयंपूर्ण केले जाते
शर्मा पुढे म्हणाले की शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना व उपक्रम राबवित आहे. महिला बचतगट व महिला मंडळ यांच्या माध्यमातून महिलांना स्वयंपूर्ण केले जाते. रोजगार व स्वयंरोजगारमार्फत महिलांना प्रशिक्षण दिले जाते. या उपक्रमांचा महिलांनी लाभ घ्यावा. सुधीर जगताप यांनी बांबू शेतीची माहिती दिली. बांबू शेती काळाची गरज असून बांबू मुळे प्रदूषणाची पातळी कमी होण्यासाठी मदत होते. त्यामुळे बांबू शेतीकडे लक्ष केंद्रित करावे. या कार्यशाळेत महिला रोजगार व लघु उद्योग, गो सेवा व गो प्रॉडक्ट मंचचे कार्य व उद्देश, मुद्रा अर्थसहाय्य योजना आदी बाबीची सविस्तर माहिती देण्यात आली. या कार्यशाळेसाठी सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा उमा क्षीरसागर, अनुराधा सानप, विद्या टोणपे, रुबी पासवान यांच्या सह परिसरातील महिला उपस्थित होत्या. पंढरीनाथ टोणपे यांनी प्रास्ताविक केले. हरिश शुक्ल यांनी आभार मानले.