महिलांनी 1000 खड्डे खोदून निर्माण केला नवा आदर्श

0

नवापूर। झाडे लावु झाडे जगवु, सारे मिळून या वसुंधरेला वाचवु या विचाराने पावसाळयाला सुरूवात झाल्या बरोबर व त्याआधी नवापूर या आदिवासी तालुक्यात नवापूर तालुक्याचे कार्यतत्पर व उपक्रमशील गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांच्या कुछ कर दिखाना है या कामातुन आदिवासी भागात जनजागृती करून नवापूर तालुक्यात लोक सहभागातून 40,000 वृक्ष लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात लोक श्रमदान करत आहेत. वृक्ष संवर्धन व त्याचे फायदे याबाबत आदिवासी गाव पाड्यावर त्यांचाच आदिवासी भाषेत प्रचार प्रसार करत मार्गदर्शनामुळे दि 23 जुन रोजी ग्रामपंचायत कारेघाट, थुवा,वागदी येथे ग्रामस्थांनी 3000 पेक्षा जास्त खड्डे खोदले.कारेघाट या आदिवासी गावातील 10 बचत गटातील महिलांनी 1000 खड्डे खोदून महाराष्ट्रातील सर्व महिलांसाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे. शासनाच्या 4 कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत नवापूर तालुक्यात लोकांच्या सहभागातुन मोठ्या प्रमाणावर गाव पाड्यावर तसेच दुर्गम भागात खड्डे खोदून स्वता लोक वृक्ष लावून त्याचे संवर्धन करणार आहेत.

लोकसहभागातून लागवड व वृक्ष संवर्धन
त्यासाठी जनजागृती केली जात आहे. तसेच शनिवारी सकाळी महिला बचत गट, विद्यार्थी, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ व शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी वृक्षारोपण व संवर्धन जनजागृती साठी गावात वृक्ष दिंडी काढण्यात आली. सदर काम सुरू असतांना नंदकुमार वाळेकर गटविकास अधिकारी प.स नवापूर , किरण गावीत विस्तार अधिकारी ( ग्रा.प) विजय ठानकर,तालुका पेसा समन्वयक यांनी कामाची पहाणी, नियोजन,मार्गदर्शन व श्रमदान केले. परमेश्वर गंडे ग्रामसेवक कारेघाट व अशोक कावळे ग्रामसेवक थुवा यांनी महिला बचत गट,ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ यांच्या सहकार्य ने कामाचे नियोजन केले.फत्तुबाई बुलजी गावीत सरपंच कारेघाट, दिलीप जीवल्या गावीत उपसरपंच कारेघाट यांनी मोठया प्रमाणात जनजागृतीचे व श्रमदानाने काम केले. एकुणच तालुक्यात गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांच्या सहकार्याने व पुढाकाराने वृक्ष लागवड व संवर्धन यासाठी मोठया प्रमाणात प्रयत्न केले जात आहे.लोकांचा सहभाग यासाठी चांगल्या प्रकारे मिळत आहे. गाव पाड्यानवर आदिवासी स्ञी पुरुष युवा वर्ग खड्डे खोदून वृक्ष लागवड व संवर्धनाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहे.