आरोपिंना फाशी देण्याची मागणी
सांगवी : सांगवी परिसरामध्ये देशामध्ये महिलांवर, मुलींवर होणार्या वाढत्या अत्याचाराच्या विरोधात सरकारच्या निषेधार्थ महिला आणि मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी ‘कँडल मार्च’ काढण्यात आले. सरकारचा निषेध करीत नराधमांना भरचौकात फाशी देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी प्रशांत शितोळे, बाबासाहेव ढमाले, कुमार ढोरे, पंकज कांबळे, बाळासाहेब पिल्लेवार, ज्येष्ठ नागरिक संघाचे बंडोपंत शेळके तसेच शिव जिजाऊ महिला प्रतिष्ठानच्या शीतल शितोळे, सारिका भोसले, आशा शितोळे, रंजना जाधव, मनीषा पुरी, वैशाली शितोळे, रीनल गोहेल, हेमा कदम, राधिका घोडके, राणी टेमगिरे शीतल दातखीळे, राजश्री पोटे, संजीवनी साबळे, निकिता धुमाळ त्याचप्रमाणे महिला दक्षता समिती महाराष्ट्र राज्य सदस्या कल्पना पवार आदी महिला उपस्थित होत्या.
अहिल्यादेवी पुतळा, ढोरे नगर, सांगवी येथे अहिल्यादेवींच्या पुतळ्यास अभिवादन करून शिव जिजाऊ प्रतिष्ठान, सिझन सोशल वेलफेअर ट्रस्ट आणि ज्येष्ठ नागरिक संघ सांगवी यांच्यावतीने जम्मू येथील कथुआ आणि उन्नाव येथे अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेध व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून निषेध आणि जनजागृती करण्याकरिता कँडल मार्च काढण्यात आला.
बलात्कारातील आरोपीला वाचविण्याचे प्रयत्न काश्मीर आणि उत्तरप्रदेशातील भाजप सरकार आणि केंद्र सरकार करीत असल्याची टीका उपस्थितांनी यावेळी केली. 8 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्यानंतर त्या मुलीच्या कुटुंबियांवर चुकीचे आरोप करुन आरोपीला वाचविण्याचे काम काही संघटनांनी सुरू केल्याचा निषेधही नोंदविण्यात आला. तसेच यापुढे कँडल मार्च ऐवजी सँडल मार्च काढण्यात येईल. या नराधमांना भर चौकात फाशी देण्यात यावी, अशी मागणी महिलांनी केली. नराधमांना कठोरात कठोर शिक्षा तर देण्यात यावीच त्याच बरोबर युवकांना समुपदेशन करण्याची गरज आहे, अशी भावना महिलांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवून श्रद्धांजली वाहिली.