पिंपरी – जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पीएमपीएमएल प्रशासनाने पिंपरी-चिंचवड शहरातील महिलांसाठी स्वतंत्र बस सुरू केली आहे. या बसला तेजस्विनी असे नाव देण्यात आले असून, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांच्या हस्ते या सेवेला सुरूवात करण्यात आली. पीएमपीएमएलने महिलांसाठी सुरू केलेली ही तेजस्विनीच्या 30 बस दोन्ही शहरातील 30 मार्गावर धावणार आहेत. भोसरी येथे स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांच्या हस्ते या बसचे उद्घाटन करण्यात आले. महिलांसाठी सुरू केलेल्या तेजस्विनी बसमध्ये 32 महिला प्रवासी बसण्याची व्यवस्था आहे. थांब्यांची माहिती देण्यासाठी डिजिटल फलक आहे. तसेच या बसबाबत आयटीएमएस यंत्रणेद्वारे पीएमपीएमएलच्या नियंत्रण कक्षात माहिती मिळणार आहे. या बसमध्ये दोन सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. त्याचप्रमाणे बसच्या मागील दरवाजाजवळ कचराकुंडी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे महिला प्रवाशांसाठी अत्याधुनिक सोयींनीयुक्त अशी ही बस आहे.