शिक्रापूर । ग्रामीण भागामध्ये अनेक महिलांना उद्योग, व्यवसायापासून वंचित राहावे लागत आहे. कित्येक ठिकाणी शेतीमध्ये पिकविलेला माल बाजारामध्ये कवडीमोल भावामध्ये विकावा लागत असल्यामुळे शेतकर्यांचे नुकसान होत आहे. परंतु आता शिरूर तालुक्यातील महिलांना हक्काची बाजारपेठ सुरू करून देणार असल्याचे क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी सांगितले आहे. करंदी (ता. शिरूर) येथे बचत गटाच्या महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना संजय पाचंगे बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बंटी ढोकले, उद्योजक बाळासाहेब ढोकले, वंदना पोतदार, प्रीती चव्हाण, कल्पना ढोकले, नलिनी शवलिकर, मंदा ढोकले, सुनिता ढोकले, सीमा ढोकले यांसह आदी महिला उपस्थित होत्या.
महिलांना घर बसल्या तसेच शेतामध्ये पिकविलेल्या शेतामध्ये पिकविलेला भाजीपाला व इतर माल विक्रीसाठी एक कंपनी स्थापन करणार आहे. यामध्ये महिलांना सभासद करून घेऊन त्या कंपनीच्या माध्यमातून सर्व गावांतील महिलांनी तयार केलेले पदार्थ तसेच महिलांनी पिकविलेला शेतमाल महिलांच्या घरूनच उचलला जाणार आहे. तसेच यातून महिलांना शेतमाल विक्रीसाठी बाजारामध्ये जाण्याची गरज नाही. तसेच या माध्यमातून एक पतसंस्था निर्माण करून महिलांना बँकेचे अर्थसहाय्य, शेतीसाठी अर्थसहाय्य व इतर बाबी पुरविण्यात येणार आहे, असे नियोजन असल्याचे पाचंगे यांनी सांगितले आहे. तर नव्याने सुरू होत असलेल्या कंपनीसाठी शिरूर तालुक्यातील एक हजार महिलांचा समूह तयार करण्यात येत आहे. या माध्यमातून महिलांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गरजू महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाचंगे यांनी केले आहे.