जळगाव । महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची सभा बुधवारी सकाळी 10 वाजता सभापती प्रतिभा चंद्रकांत कापसे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तर पालिकेच्या स्थायी समितीची सभा सकाळी 11 वाजता सभापती ज्योती शैलेंद्र इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
स्थायी समितीच्या सभेत विषय पत्रिकेवरील 13 प्रशासकीय प्रस्तावांचा समावेश आहे. त्यात प्रामुख्याने मुख्य पोस्ट ऑफिस, रेन्ट फ्रि क्वॉटर्स बळीरामपेठ ही मिळकत केंद्र शासनाची असल्याने या मिळकतीवरील मालमत्ताकराची रक्कम 4 लाख 51 हजार 490, महाराष्ट्र अधिनियमाचे कलम 152 अन्वये निर्लेखित करण्याबाबत प्रशासनाकडून आलेल्या प्रस्तावावर निर्णय घेणे, मनपा आरोग्य विभागाकडील वाहन क्रमांक (एम.एच.19 एम.9119) (कॉम्पॅक्टर) या वाहनावरील खर्च 44 हजार 800 खर्चास मान्यता मिळणेबाबत, नागरिक दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत मनपा हद्दीतील युनिट क्रमांक 22 अंतर्गत गोपाळपुरा ते कोल्हे गोडावून ते मन्यारवाडा लगत रिटेनिंग वॉल बांधणे व पुल दुरुस्ती करणे, लांबी एका बाजूस 120 मीटर कामी मक्तेदार युवराज कन्स्ट्रक्शन यांच्या निविदा रकमेचे दरास मान्यता मिळणेबाबत. तसेच दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत प्रभाग क्रमांक 14 पिंप्राळा गट नं.214/4 मध्ये आरसीसी गटार बांधणे, यासह इतर प्रशासकीय आदेश व संविदांचा समावेश आहे. तसेच महिला बालकल्याण समितीच्या सभेत सन 2018.19 या शालेय वर्षाकरीता मनपा संचलित बालवाडीतील मुलांना पुरक पोषण आहार पुरविण्याबाबत प्रशासनाकडून आलेल्या प्रस्तावावर विचार करुन निर्णय घेणे याचा समावेश आहे.