पाच पोलीस ठाण्यात जानेवारी 2017 ते जुलै 2018 या दीड वर्षात बलात्काराचे 70 गुन्हे दाखल
विनयभंग आणि छेडछाडीच्या 162 घटनांची झाली नोंद
निगडी : बलात्कार, विनयभंग, महिला छेडछाड या घटना पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे शहराची ओळख औद्योगिक नगरी ऐवजी गुन्हेगार नगरी अशी होत आहे. शहरात मागील दीड वर्षात निगडी पोलीस ठाण्यात सर्वाधिक बलात्काराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हेगारांना अटक करून त्यांना शिक्षा होत असली तरीही या आकडेवारीत घट होताना मात्र दिसत नाही. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चिंचवड येथील नीता परदेशी यांनी याबाबतची माहिती माहिती अधिकारात मागवली होती. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी, एमआयडीसी भोसरी आणि निगडी या पाच पोलीस ठाण्यात जानेवारी 2017 ते जुलै 2018 या दीड वर्षात बलात्काराचे 70 गुन्हे दाखल झाले असून त्या गुन्ह्यातील 74 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर विनयभंग आणि छेडछाडीच्या 162 घटना दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये पोलिसांनी 96 आरोपींना अटक केली.
हे देखील वाचा
पिंपरीत 8, चिंचवडमध्ये 1 गुन्हा
नीता परदेशी यांनी मागवलेल्या माहितीनुसार, मागील दीड वर्षात बलात्काराच्या घटना पिंपरी पोलीस ठाण्यात आठ, चिंचवड एक, भोसरी 16, एमआयडीसी भोसरी 19 आणि निगडी पोलीस ठाण्यात 26 दाखल झाल्या आहेत. या दाखल गुन्ह्यांमधील भोसरी पोलिसांनी 14, एमआयडीसी भोसरी पोलिसांनी 18 आणि निगडी पोलिसांनी 42 गुन्हेगारांना अटक केली आहे. महिला छेडछाड आणि विनयभंगाच्या पिंपरी पोलीस ठाण्यात 66, चिंचवड 12, भोसरी 25, एमआयडीसी 12 आणि निगडी पोलीस ठाण्यात 46 घटना दाखल करण्यात आल्या. त्यातील भोसरी पोलिसांनी 20, एमआयडीसी भोसरी 12 आणि निगडी पोलिसांनी 64 आरोपींना अटक केली आहे.
कित्येक घटना दाखल नाही
लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाच्या घटना महिलांनी पुढाकार घेऊन तक्रार दिल्याने, तसेच शाळकरी मुलींना आलेल्या अडचणी आणि अन्य कारणांमुळे पालकांनी दाखल केलेल्या आहेत. अशा कित्येक घटना असतील ज्या सामाजिक दबावापोटी दाखल झालेल्या नाहीत. त्यामुळे शहरातील ही आकडेवारी निश्चित वाढणारी आहे. ही बाब औद्योगिक विकासात पुढारलेल्या शहराला काळिमा फासणारी आहे. लैंगिक शिक्षणाच्या अभावामुळे अनेक शालेय विद्यार्थीनींना त्यांच्यासोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराची जाणीव देखील होत नाही. अनेक दिवसानंतर या घटना उघडकीस येत आहेत. त्यामुळे सर्व शाळांमध्ये याबाबतचे शिक्षण देणे आवश्यक आहे. महिलांनी देखील सामाजिक दबावाला बळी न पडता पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करायला हवेत. गुन्हेगारांवर पोलीस प्रशासनाचा धाक बसवणे आवश्यक आहे.