विविध मागण्यांसाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन
पुणे । राज्य शासकीय महिला अधिकारी व कर्मचार्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व महिला अधिकारी, कर्मचार्यांनी बुधवारी (दि. 8) लक्षवेध दिन पाळला. महिला अधिकारी व कर्मचार्यांच्या विविध मागण्यांकडे मुख्यमंत्र्यांनी त्वरीत लक्ष घालून, येत्या जागतिक महिला दिनापुर्वी (8 मार्च 2018) याबाबत निर्णय घ्यावेत. यासाठी महिला अधिकारी व कर्मचार्यांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात दुर्गा महिला मंचच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांच्याकडे सुपुर्द केले. यावेळी संघटनेच्या उपाध्यक्ष सि. च. सेवतकर, महिला सहसचिव सविता नलावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
विविध समस्यांबाबत 12 प्रस्ताव
राज्य शासनांतर्गत येणार्या शासकीय कार्यालयातील महिला अधिकार्यांचे प्रश्न हाताळण्यासाठी अधिकारी महासंघांतर्गत दुर्गा महिला मंच कार्यरत आहे. महिला अधिकारी-कर्मचार्यांच्या प्रश्नांकडे शासन-प्रशासन स्तरावर दखल घेण्यासाठी अधिकारी महासंघाच्या महिला पदाधिकारी व अन्य महिला कर्मचार्यांची अधिकारी महासंघाच्या कार्यालयात बैठक झाली होती. यामध्ये महिला अधिकारी-कर्मचार्यांच्या विविध समस्यांबाबत 12 प्रस्ताव संमत करण्यात आले. या सर्व प्रश्नांबाबत कार्यवाही होण्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला.
विविध मागण्या
बालसंगोपन रजा मंजूरी, वार्षिक वैद्यकीय तपासणी, ग्रॅच्युईटी गणना महागाई भत्ता धरून करणे, प्रसुती रजेला जोडून बालसंगोपनासाठी घेतलेली असाधारण रजा अर्हताकारी सेवा म्हणून मान्य करणे, ताण व्यवस्थापनाबाबत शिबिरांचे शासनस्तरावरून आयोजन होणे, पाळणा घराची सुविधा शासकीय कार्यालयात तसेच जिल्ह्यातील/तालुक्यांतील महत्त्वाच्या ठिकाणी उपलब्ध करून देणे, अशा विविध बारा विषयांचा निवेदनात समावेश असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पुणे जिल्हा समन्वय समितीने दिली.