पिंपरी चिंचवड : वाकड पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक महिला अधिकाऱ्यांशी टेम्पो चालकाने हुज्जत घातल्याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मध्यरात्री पिंपरी-चिंचवडच्या डांगे चौकात घडली असून महिला पोलीस उपनिरीक्षक संगीता जिजाभाऊ गोडे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार वाहन चालकावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल फुलचंद थोडसरे (वय-२६, रा.चिंचवड गाव, मूळ-खामसवाडी, जि. उस्मानाबाद) असं हुज्जत घालणाऱ्या टेम्पो चालकाचे नाव आहे. बुधवारी मध्यरात्री महिला पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांचे कर्मचारी हे रात्रीची गस्त घालत होते. त्यावेळी डांगे चौकात टेम्पो उभा असल्याचे दिसले,चालकाला टेम्पो बाजूला घेण्यास सांगितला मात्र त्याने टेम्पो बाजूला न घेता महिला पोलीस उपनिरीक्षकाशी हुज्जत घातली आणि शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी टेम्पो चालकाला ताब्यात घेतलं आहे.