’महिला आयोग आपल्या दारी’

0

पुणे । विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारींचे निवारण व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग ’महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम राबवित आहे. याअंतर्गत मंगळवारी (दि.23) पुण्यात जनसुनावणी घेण्यात आली. आयोगाकडे दाखल असलेल्या 24 तसेच सुनावणी दरम्यान प्राप्त 26 नव्या तक्रारी अशा एकूण 50 तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्यासह वकील, पोलीस अधिकारी, समुपदेशक व महिला व बाल विकास अधिकारी यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पूर्ण झाली.

याच उपक्रमांतर्गत कोल्हापूर नुकतीच सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी 60 तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली. या सुनावणीत विभक्त होण्याच्या मार्गावर असलेली 4 जोडपी समुपदेशनानंतर पुन्हा एकमताने संसारात रमली. पुणे विभागात कोल्हापूर आणि पुणे अशा दोन ठिकाणी स्वतंत्र सुनावणी, समुपदेशन केले. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्व तक्रारींवर कार्यवाही केली आहे.

’झिरो पेंडन्सी’
फेब्रुवारी 2016 पासून पुण्यासह सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील दाखल सर्व 110 तक्रारींवर सुनावणी पूर्ण झाली आहे, अशी माहिती रहाटकर यांनी यावेळी दिली. ’महिला आयोग आपल्या दारी’ यासारख्या उपक्रमामुळे महिलांना तात्काळ न्याय मिळत आहे. त्यामुळेच सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यातील फेब्रुवारी 2016 पासूनच्या तक्रारींबाबत ’झिरो पेंडन्सी’ झाली आहे.