नवी दिल्ली : महिलांना संसद आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये 33 टक्के आरक्षणाची तरतूद असणार्या महिला आरक्षण विधेयकासंदर्भात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. लोकसभेत भाजपचे बहुमत आहे. त्यामुळे रखडलेले महिला आरक्षण विधेयक मंजूर करता येऊ शकते, असे पत्रात म्हटले आहे.
काँग्रेसच्या काळातील विधेयक
काँग्रेसच्या काळात हे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले होते. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने सरकारने मोठे पाऊल टाकले आहे, असे त्यावेळी सांगण्यात येत होते. हा सोनिया गांधीचा विजय असल्याचे काँग्रेसकडून सांगितले जात होते. पण मनमोहन सिंग सरकारला हे विधेयक लोकसभेत मंजूर करून घेता आले नाही. त्यावेळी समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, तृणमूल काँग्रेसने या विधेयकाला जोरदार विरोध केला होता. काँग्रेसचे काही खासदारांचाही या विधेयकाला विरोध होता. तेव्हापासून रखडलेले हे विधेयक लोकसभेत मंजूर करून घ्यावे, असे आवाहन गांधी यांनी मोदींना पत्राद्वारे केले आहे. भाजप सरकारचे लोकसभेत बहुमत आहे. त्यामुळे हे विधेयक मंजूर करून घेण्यात यावे. महिला सबलीकरणासाठी या विधेयकाला काँग्रेस पक्ष पाठिंबा देईल, असे सोनिया गांधी यांनी पत्रात म्हटले आहे.