चंदिगढ-भारतीय महिला टी २० संघाची कर्णधार हरमनप्रीत सिंग हिच्यावर सरकारी नोकरी गमावण्याची नामुष्की ओढवण्याची शक्यता आहे. पोलीस पडताळणी दरम्यान हरमनप्रीत हिची पदवी बोगस असल्याची माहिती अहवालात समोर आली आहे. क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीच्या बळावर तिची पंजाब पोलीसमध्ये उपाधिक्षक (डीएसपी)पदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, या बोगस पदवीमुळे आता तिचे पद धोक्यात येण्याची शक्यता आहे.
हरमनप्रीतचा जन्म हा पंजाबच्या मोगा गावात झाला असून मेरठच्या चौधरी चरण सिंग विद्यापीठातून तिने पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. हरमनप्रीत ही या आधी रेल्वेसेवेत रुजू होती. तिची पदवी बोगस असल्यामुळे तिला या पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे हरमनप्रीतला या पदावर कायम ठेवू नये, असे पत्र पोलीस विभागाने गृहखात्याला पाठवले असल्याचेही सांगितले जात आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याकडे गृह खात्याचीही जबाबदारी आहे.
हरमनप्रीत सिंग हिने सादर केलेली पदवी मेरठच्या चौधरी चरण सिंग विद्यापीठाची आहे. मात्र, या संदर्भात अधिक तपास केल्यावर ही पदवी बोगस असल्याचे समोर आले आहे, असे पोलीस उपसंचालक (प्रशासकीय विभाग) तिवारी यांनी सांगितले. दरम्यान, हरमनप्रीतला स्वतःला सिद्ध करण्याची संधी देण्यात येईल. तिने पात्रतेच्या निकषांत बसणाऱ्या पदव्या सादर केल्या, तर तिला त्या पदावर पुन्हा कार्य करता येईल.