नवी मुंबई : महाराष्ट्रात महिलांवरील वाढत्या अत्याचारांवर/ तक्रारींवर सुरक्षेच्या माध्यमातून आळा घालण्यासाठी गृह मंत्रालयाने पोलीस ठाण्यात महिला पोलीस पथक तैनात केले असून ह्या पथकाला अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण वाहन उपलब्ध करून दिले आहे.
नवी मुंबईतील परिमंडळ-1 साठी महिला पोलिसांना सुसज्ज अशी नवी कोरी एर्टिगा कार मिळाली आहे. ही कार चोवीस तास पेट्रोलिंग करीत फिरत असते. एखादी महिला किंवा युवती अडचणीत असल्यास 100 नंबरला फोन केल्यास ही गाडी काही मिनिटांच्या आंत घटनास्थळी मदतीसाठी पोहचते. परिमंडळ एक अंतर्गत पोलीस स्टेशन्सना मिळालेल्या गाडीवर पोलीस उपनिरीक्षक सरीता मुसळे यांची टीम तैनात आहे. कंट्रोलला (100 नंबरला) कॉल गेल्यावर त्याची सूचना विशेष महिला पोलीस पथकाला मिळते. हे पथक तक्रारदाराला मदत करून गुन्हा नोंदवायचा असल्यास स्थानिक पोलीसांकडे सुपूर्द करून दिले जातात. महिला सुरक्षेसाठीची ही चांगली सुविधा उपलब्ध झाली असून ह्या गाडीत सुसज्ज वायरलेस यंत्रणा उपलब्ध आहे. आम्हाला वाशी स्टेशन परिसरातल्या जास्त तक्रारी कण्ट्रोल रुमकडून प्राप्त होत असल्याची माहिती महिला पोउपनि. सरीता मुसळे यांनी दिली. महिला, युवतींना कुठल्याही प्रकारची समस्या असल्यास, कुणी त्रास देत असल्यास पोलिसांच्या शंभर नंबरवर कॉल केल्यास काही अवधीत विशेष महिला पोलिसांची गाडी तक्रारदाराच्या मदतीला हजर असेल. महिलांनी बिनधास्तपणे कॉल करुन समाजातील विकृतींना आळा घालण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन सरीता मुसळे यांनी केले आहे.