महिला तस्करी हा स्त्रीच्या आत्मसन्मानावरचा सर्वात मोठा घाला आहे. ज्या समाजाने नेहमीच स्त्रीला आद्यशक्तीचे रूप मानले आहे किंवा ज्या समाजाने नेहमीच एखाद्या देवीला श्रद्धास्थानी मानून तिची भक्तिभावे पूजा केली आहे, त्याच समाजात आजच्या आधुनिक युगात मानवी व महिला तस्करीची कारणमीमांसा करावी लागते ही जरी थोडी निराशेची बाब असली तरी त्यासाठी भारताच्या पुढाकाराने महिलांची तस्करी – विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद 27-28 जुलैला मुंबईत भरत आहे आणि या क्षेत्रात अशा तस्करीविरोधात कार्यशील विविध देशांतील जाणकार, सरकारी यंत्रणा आणि सामाजिक भान असलेल्या संघटना यांच्या चर्चेतून सकारात्मक काही निष्पन्न होऊ शकेल ही त्या निराशेला असलेली आशेची रुपेरी किनार आहे. मुळात महिला तस्करीसारख्या उद्योगाला चालना मिळते कशी किंवा पीडित महिला या दुष्टचक्रात कशा अडकतात हे समजून घेणे गरजेचे आहे. जागतिक बँकेच्या 2015च्या अहवालानुसार जगात स्त्रियांचे प्रमाण 49.55 टक्के आहे. 81 देशांमध्ये स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आहे, तर 36 देशांमध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक आहे. मात्र, जगभरातील मालमत्तेपैकी केवळ एक टक्का मालमत्तेच्या त्या मालक आहेत. याउलट वेश्याव्यवसायासाठी जगभरात महिलांची तस्करी होत असून अमली पदार्थानंतर होणारी ती सर्वांत मोठी तस्करी आहे. म्हणजेच नशिबी तसे काही नाही आणि आहे तेही ओरबाडले जाते अशी जगात बहुतांशी महिलांची परिस्थिती दिसते. मुलींचे व महिलांचे तस्करीच्या जाळ्यात अडकण्याचे महत्त्वाचे कारण हे कधीही न संपणारी कायमची गरिबी हे आहे. चांगल्या नोकरीच्या आमिषाने अनेक वेळा या मुलींना दुसर्या शहरांत नेण्यात येते व देहविक्रीच्या व्यवसायाला लावण्यात येते. निदान घरच्यांना काही पैसा गाठीला ठेवून पाठवता येईल या विचाराने कालांतराने या महिलाही प्रतिकार करणे सोडून देतात. लग्नाचे आमिषही मुलींना डोळे मिटून एखाद्या तस्करावर विश्वास ठेवायला कारणीभूत ठरते. ही तर झाली बाह्य कारणे. आपल्या समाजात मुलीला घरातच मिळणारा दुय्यम दर्जा किंवा अनेक वेळा गरिबीला कंटाळून पैशाच्या लालसेपायी जन्मदात्या आईवडिलांनीच मुलीला तस्करीच्या दलदलीत लोटल्याची उदाहरणेही आहेत. उच्चभ्रू समाजातल्या बेसुमार पैसा असलेल्या पुरुषांपासून वाढते शहरीकरण व त्या अनुषंगाने कामानिमित्त गावातून स्थलांतरित झालेले एकटे पुरुष हे सगळेच या महिला तस्करीच्या बाजारपेठेतील प्रमुख ग्राहक ठरतात. भारतात काही मागासलेल्या भागांमध्ये अजूनही प्रचलित असलेली वर्ण व्यवस्था, अशी कारणे आपल्याला देता येतील. महिलांची तस्करी ही केवळ देहविक्रयासाठीच होते असे नाही. अनेक वेळा स्वस्त श्रम बाजार हेही त्याचे कारण असू शकते. जिथे पैसे मिळवण्याचे कुठलेच साधन उपलब्ध नाहीत त्यांची तस्करी परदेशी किंवा शहरांत मुले सांभाळणे, घर काम करणे किंवा नोकरीसाठी होऊ शकते.
शासकीय यंत्रणेत यासंबंधी कायदा असला, तरीही त्याचा वापर योग्य त्या पद्धतीने होताना दिसत नाही. मूळ कायदे आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीत चांगलीच तफावत दिसून येते. नीती भ्रष्टता, आर्थिक भ्रष्टाचार व लाचखाऊपणाची वृत्ती ही समाजात खोलवर पसरलेली आहे आणि त्यात महिला तस्करीतून होणारा अमाप फायदा यामुळे या तस्करांना सुटणे सोपे जाते. झालेल्या अत्याचाराने व्यथित महिलाही साक्ष द्यायला समोर येण्यास कचरतात. त्यामुळे तस्करांचे अधिकच फावते. महिला तस्करी या विषयावरील या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने सर्व सहभागी देश, राज्ये यांच्या अनुभवांतून या क्षेत्रातील सद्यःस्थिती व तस्करीचे तेजीने बदलत जाणारे रूप याचा आढावा घेत मानवी व महिला तस्करीच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी, तस्करांवरच्या खटल्यासाठी, त्यांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांच्या उपचारार्थ, त्यांच्या पुनर्वसनासाठी, नवीन एकात्मिक कायद्याची रचना करणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारला सर्वंकष मदत करण्याची आयोगाची भूमिका आहे.
विजया रहाटकर
अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य महिला आयोग