महिलांवरील अत्याचाराचा वाढता आलेख पाहता या परिस्थितीत बदल होण्याची चिन्हे काही दिसून येत नाहीत. पदोपदी स्त्रीला कमी लेखले जाते. खरचं इतकी वाईट आहे का ती. आजची स्त्री कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. कॉर्पोरेट, राजकारण अशा सर्वच ठिकाणी ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. मोठ मोठ्या पदांवर ती कर्तव्य बजावत आहे. परंतु हे करत असताना कौंटुंबिक जबाबदारीही तितक्याच जबाबदारीने सांभाळते हेही विशेषच आहे. असे असूनही तिला डावलले जाते, बंधने घातली जातात. या कचाट्यातूनही ती स्वत:चे अस्तित्व निर्माण करते. असे असूनही तिला नाकारले जाते. उमलण्यापूर्वीच तिला कुसकुरून टाकले जाते. अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराचा आकडा पाहता डोळे भिरभिरू लागतात. जन्मदात्या पित्याच्या तावडीतूनही ही चिमुरडी सुटलेली नाही. तिच्यावर अत्याचार करणारे तिचे नातेवाईक, आजूबाजूला वावरणारेच असतात. ही परिस्थिती पाहता मुलगी जन्माला येणे पालकांसाठी डोकेदुखी ठरते. भ्रूणहत्येसाठी हेही एक कारण जबाबदार असू शकते.
आज आज 8 मार्च. हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. यानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आता महिनाभर हे कार्यक्रम असेच सुरूच राहतील. महिलांच्या सत्कारापासून ते त्यांच्या सुखसुविधांपर्यंत कार्यक्रम आखले जातील. विविध योजनांची घोषणाही होईल. महिलांसाठी कशा सुविधा पुरविल्या, त्यांच्या संरक्षणासाठी कोणत्या योजना आखल्या, मुलींचा जन्मदर वाढविण्याचे प्रयत्न यासारख्या विविध माध्यमातून महिलांना समाजात उच्च स्थान दिल्याचे सर्वांसमोर मांडले जाते. दाखवून दिले जाते. यासाठी गावपातळीपासून ते कार्पोेरेट लेव्हलपर्यंत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. आजकाल तर या कार्यक्रमांना इव्हेंटचे रूप आले आहे. फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करून एका छोट्याशा खेड्यातील धैर्यवान महिलेची कथा सर्वांसमोर मांडली जाते आणि तिचा सत्कार केला जातो. तिच्या कामासाठी आवश्यक आर्थिक मदतही तिच्यापर्यंत पोहचवली जाते. यासाठी राजकीय पुढार्यांपासून अभिनेते, खाजगी संस्था सर्वचजण पुढाकार घेतात. तिचे कोडकौतुक करून तिला कॅमेर्यासमोर आणले जाते. या माध्यामातून तिला प्रसिद्धी तर मिळतेच शिवाय तिचे मनोधैर्यही वाढते. जणूकाही सर्वचजण तिच्या पाठीशी उभे आहेत, असे तिला जाणवते. या सर्व सोपस्कारामुळे ती महिला खूपच भारावून जाते.
या इव्हेंटची मानकरी ठरलेल्या महिलेला इथपर्यंत पोहचण्यासाठी जो खडतर प्रवास करावा लागला त्याचे काय? हा प्रवास ती एकटी न डगमगता करते. अन्यायाला वाचा फोडते त्याचाच हा गौरव असतो. परंतु तिच्या आयुष्यातील कडू आठवणींसाठी जबाबदार पण तिच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकच असतात. मग हा सन्मान कोणाचा म्हणायचा. तिला त्रास देणार्या समाजाचा की तिचा. समाजाचा अशासाठी की, त्यातूनच ती न डगमगता मार्ग काढत इथवर पोहचली म्हणून की, आपल्यावरील अन्यायाला तिने वाचा फोडली म्हणून. जो समाज तिच्या अत्याचाराला कारणीभूत असतो, तोच तिचा सन्मान करीत असतो. परंतु हा सन्मान फक्त महिला दिनापुरताच मर्यादित असतो का, असा सवाल आज उपस्थित होत आहे. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील पुढारलेली मंडळी आपापली पोळी भाजून घेत असतात. त्यासाठीच त्यांचा हा अट्टाहास असे म्हणणे येथे वावगे ठरणार नाही.
जानेवारी महिना सुरू होताच महिला दिनाचे वेध लागतात. काही जण वर्षभरापासून या कार्यक्रमांची आखणी करीत असतात. प्रमुख पाहुणे मंडळींपासून ते कोणाचा आणि किती महिलांचा सन्मान करायचा याची तयारी चालते. मोठमोठ्या कंपन्या या कार्यक्रमाच्या आयोजनांमध्ये उतरल्या आहेत. त्यामध्ये मग चढाओढ लागते ती पाहुणे मंडळींच्या हजेरीची. सुप्रसिद्ध व्यक्तींना कार्यक्रमात बोलावून कंपनीचे नाव मोठे करायचे. त्यासाठी मग मान्यवरांच्या सोयीनुसार कार्यक्रमाची तारीख आणि वेळ निश्चित करून सर्वांचे लक्ष कार्यक्रमाकडे आकर्षित केले जाते. या सर्व खटाटोपात ज्यांचा सन्मान करण्यात येणार असतो त्या मात्र येथेही दुर्लक्षितच असतात. मग हा सन्मान कशासाठी?
असो, या दिनाचेनिमित्त साधून तरी महिलांना एक दिवसा पुरता का होईना पण सन्मान मिळतो. परंतु, या दिनाचे कोणतेही सोयरसुतक सर्वसामान्य महिलांना नसते. बर्याच जणींना तर महिला दिन आहे, हे माहीतही नसते. आणि माहीत असले तरी त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतात. महिला दिन असला म्हणून काय झाले, त्याने आयुष्यात तर काही फरक पडणार नाही ना, मग का त्यात वेळ घालवायचा, शेवटी बाईची कामे बाईलाच करायची असतात, तिचा त्रास तिलाच सोसावा लागणार आहे, त्यात थोडी बदल होणार, अशा प्रतिक्रिया महिलाच देत असतात. घराची कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना तारेवरची कसरत करत तिचा दिवस संपून जातो. त्यामुळे या दिवसाचे कोणतेही महत्त्व तिला जाणवत नाही. या दिवसाचे महत्त्व असते ते फक्त आयोजक कंपन्यांना. महिला दिन साजरा करणे म्हणजे केवळ गोड गोड संदेश देऊन समारंभ करणे अशा खुळात आपण किती दिवस राहणार आहोत? आजही रोजच्या जीवनात स्त्रियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. दररोज बलात्कार, हुंडा बळी, शारिरीक शोषण, फसवणूक अशा अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल होत आहेत. मुलगी जन्माला येण्यापूर्वीच तिचा गळा घोटला जातो. असे क्रूर कर्म करणार्याला एवढे कसे कळत नाही, की तोही एका बाईच्याच पोटी जन्माला आला आहे. या गोष्टीचा विसर त्याला कसा पडतो. त्यामुळे मुलींचा जन्मदर घटत चालला आहे. याचे गांभीर्य ओळखून सरकारनेही उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. कायदे आणि शिक्षाही कडक केली आहे. परंतु, तरीदेखील चोरीछुपे हे कृत्य सुरूच असल्याचे अनेकदा समोर येते. जन्माला येण्यापासून ते आयुष्य संपेपर्यंत महिलांचे कष्ट काही केल्या संपत नाहीत. कुटुंबाला वारस हवा म्हणून मुलीचा जन्म नाकारला जातो. आजच्या पुढारलेल्या युगातील स्त्री लग्नानंतरही आईवडिलांचा सांभाळ करते. त्यांची सेवा करते. एक मुलगा कर्तव्य बजावण्यात मागे पडू शकतो परंतु मुलगी नाही. सासर आणि माहेर दोन्ही नाती उत्तम प्रकारे जपते. पण हे या खुळचट समाजाला कधी कळणार कोणास ठाऊक.
याच समाजातील वाईट प्रवृत्तीच्या नागरिकांमुळे महिलांचे जीणे कठीण होऊ बसते. प्राणघातक, अॅसिड हल्ले, लैंगिक शोषण, हुंडा बळी अशा अनेक कारणांसाठी महिलांचा जाच केला जातो. घर, ऑफिस सर्वच ठिकाणी लैंगिक अत्याचारांना सामोरे जावे लागते. याबद्दल कोणाला काही सांगताही येत नसल्याने तिची कुचंबणा होते. त्यातच तिने आपल्यावर होणार्या अत्याचाराला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला तर तिचे आयुष्यच संपवले जाते. बलात्कार पीडित महिलांची अवस्था तर अत्यंत बिकट. त्यांचे तर जीणे कठीण होऊन बसते. बलात्कार झाल्यापासून ते या धक्क्यातून सावरल्यानंतर तिला हिणवले जाते. या प्रकारात महिलाही तितक्याच सहभागी असतात. समाज कितीही सुधारला तरी त्यांचा महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन काही बदललेला नाही. मागे एका बलात्कार प्रकरणात तर एका राजकीय महिलेनेच पीडित महिलेचे धिंडवडे काढले. पीडितीने जो ड्रेस परीधान केला त्यामुळे बलात्कार झाला असा आरोप करून खळबळ माजवली होती. महिलाच महिलांवर आरोप करू लागल्या आहेत. बलात्कार झालेल्या महिलांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी त्यांच्यामध्ये जगण्याची नवी उमेद तयार करण्यासाठी शासनाने मनोधैर्य योजना आखली आहे. परंतु या योजनेचा किती जणींना लाभ मिळाला याबाबतची कोणतीच माहिती आजपर्यंत समोर आली नाही. कोणाची मदत मिळो या ना मिळो यातूनही त्या सावरतात आणि समाजात आपले नाव उंचावतात. संकटांना धैर्याने सामोरे जाऊन त्यांनी आपले स्थान उंचावले आहे. तिच्या या कर्तृत्वाला सलाम. नुसता सलाम करण्या इथपर्यंतच महिला दिनाचे महत्त्व असते का? महिला दिनानिमित्त महिलांच्या कर्तृत्वाची वाहवा करून काय साध्य होणार आहे. एक दिवसाचा उदो उदो आणि नंतर पुन्हा तेच जीणे. याला काय अर्थ? महिलांचा गौरव करायला महिला दिनाची का वाट पाहावी लागते. महिला दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमांचा बोलबाला करण्याची गरजच काय? एखादी महिला खरचं कर्तृत्ववान, धैर्यवान आहे मग तिचा केव्हाही आणि कुठेही सत्कार करता येतो. त्यासाठी वर्षभर वाट पाहायची आणि विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्याची गरजच नाही. महिलांचा जर खरचं सन्मान करायचा असेल तर समाजात तिला तिच्या हक्काची जागा द्या. तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदला. त्यासाठी जनमानसातील मानसिकता बदली पाहिजे. समाजात हा मोठा बदल होण्याची नितांत गरज आहे. तरच महिलांचा दररोज खरा सन्मान होईल. मग या इव्हेंटची गरज भासणार नाही.