बारामती : येथिल तहसिल कार्यालयात प्रशासनाच्या वतिने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते महिला नवमतदारांना मतदान ओळखपत्राचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी महिलांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. जागतिक महिला दिनानिमित्त तालुक्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असणार्या महिला, विद्यार्थीनी उत्सर्फुतपणे सहभागी झाल्या होत्या. यावेळी प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसिलदार हनुमंत पाटील, शारदेय महिला रोजगार स्वयंरोजगार संस्थेच्या अध्यक्षा अनिता खरात, नायब तहसिलदार दयानंद कोळेकर, शासकीय महिला कर्मचारी उपस्थित होत्या.प्रांताधिकारी निकम यांनी जागतिक महिला दिनाच्या उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या.तसेच महिला सर्व क्षेत्रात आपला सहभाग नोंदवत असल्याचे गौरवोद्गार काढले. तहसिलदार पाटील यांनी प्रस्ताविकात महिला दिन कार्यक्रमाची रुपरेषा विशद केली.खरात यांनी यावेळी देशातील लोकशाही बळकट करण्यासाठी महिलांनी मतदान प्रक्रियेत आपला सहभाग वाढविण्याची अपेक्षा व्यक्त केली.