पनवेल । जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने महिला पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. पनवेल येथील शासकीय विश्रामगह येथे मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात तृप्ती पालकर(साम टी. व्ही), स्वप्नाली देसाई (नवी मुंबई आवाज टीव्ही. ), चेतना वावेकर(कर्नाळा टीव्ही ), सीमा भोईर (दै. पुढारी), ऋतुजा महामुनी(दै. सकाळ ) या महिला पत्रकारांचा सत्कार करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमास मंचाचे सल्लागार ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, अध्यक्ष हरेश साठे, उपाध्यक्ष राजू गाडे, सरचिटणीस नितीन कोळी, कार्यकारिणी सदस्य अविनाश कोळी, विवेक पाटील, संजय कदम, प्रशांत शेडगे, प्रवीण मोहोकर तसेच संदीप भगत, योगेश पाटील, लक्ष्मीकांत ठाकूर, आदी उपस्थित होते.
यावेळी माधव पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्यांचे विविध क्षेत्रांतील कार्य वाखाणण्याजोगे असून, समाजातील सर्व घटकांसाठी प्रेरणादायी आहे. समाजातील दोष दूर करण्याचा व समाजाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न पत्रकारांकडून होत असून यामध्येही महिला पत्रकारांचा योगदान मोठे आहे, असेही पाटील यांनी नमूद केले.
या वेळी सत्कारमूर्ती स्वप्नाली देसाई, तृप्ती पालकर, चेतना वावेकर, सीमा भोईर, ऋतुजा महामुनी यांनी सत्काराबद्दल पत्रकार मंचाचे आभार व्यक्त केले व हा फक्त सत्कार नसून आमच्या पुढील वाटचालीसाठी एनर्जी आहे, असे भावोद्गार काढले.