पुणे । आपल्या देशात सामाजिक परिवर्तन क्षेत्रात महिलांची संख्या वाखाणण्याजोगी आहे, मात्र असे असले तरी सामाजिक जीवनात त्यांना अनेक सांस्कृतिक अडचणींचा सामना करावा लागतो, ही सद्यस्थिती आहे. याच अडचणींवर मात करत महिला परिवर्तनवाद्यांची संख्या वाढविण्यासाठी आपण एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत हनीबी नेटवर्कचे संस्थापक पद्मश्री प्रा. अनिल गुप्ता यांनी व्यक्त केले.
पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने आयोजित ‘सामाजिक परिवर्तन मंच’ या कार्यक्रमात गुप्ता बोलत होते. यावेळी जनवाणी, भाऊ इन्स्टिट्युट, एमसीसीआयए, व्हेंचर सेंटर आणि सायन्स टेक पार्क यांचे सहकार्य लाभले होते. पीआयसीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, पीआयसीचे मानद संचालक प्रशांत गिरबाने आदी उपस्थित होते. ‘ग्रास रुट्स इनोव्हेश्न माइंड्स ऑन मार्जिन आर नॉट मार्जीनल माइंड्स’ या प्रा. गुप्ता लिखित पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.
‘त्यांना’ पिढीजात व्यवसायापासून दूर ठेवले जाते
प्रा. गुप्ता म्हणाले, आज सामाजिक परिवर्तन क्षेत्रात महिलांची संख्या कमी असण्याची दोन प्रमुख कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे त्यांना सांस्कृतिकरित्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागतो. याबरोबरच पारंपरिकरीत्या चालत आलेल्या पिढीजात व्यवसायांपासून त्यांना दूर ठेवले जाते आणि ज्यामुळे नवीन काहीतरी परिवर्तन करण्याची संधीच मुळात त्यांना मिळत नाही. काही वर्षांपूर्वी 1990च्या सुरुवातीला हनीबी नेटवर्कच्या मदतीने सामाजिक परिवर्तनाच्या कामाला आम्ही सुरुवात केली. आज या कामाचा विस्तार होत असून देशभरातील 60 हजारांहून अधिक सामाजिक परिवर्तनकर्ते आमच्या संपर्कात आहेत. सामाजिक परिवर्तनासाठी शासनाच्या वतीने आर्थिक मदत मिळत असली तरीही खासगी संस्थांनी पुढे येत मदतीचा हात दिला पाहिजे.
‘ती’ विचार करण्याची केंद्रे
डॉ माशेलकर म्हणाले, आज देशाची लोकसंख्या 1.25 कोटी आहे. मात्र हे केवळ चेहरे नसून ती विचार करण्याची केंद्रे आहेत. त्यामुळे आपल्या देशात सामाजिक परिवर्तनासाठी या सर्वांनी एकत्र येत काम करणे गरजेचे आहे. हे करीत असताना कोण काय व्यवसाय करतो हे महत्त्वाचे नसून ते कशा पद्धतीने परिवर्तनाचा वेगळा विचार करू शकतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यातूनच सर्वांगीण विकास साध्य होईल.