महिला पोलिसांनी पाहिले पोलीस स्टेशनचा कारभार

0

नारायणगाव : नारायणगाव (ता.जुन्नर) येथील पोलीस स्टेशनमधील महिला पोलिसांनी दैनंदिन कामकाज पहात मोठ्या उत्साहात महिला दिन साजरा केला. ठाणे अंमलदार म्हणुन महिला पोलीस नाईक प्रियंका लोंढे, मदतनीस म्हणुन म.पो.कॉ. निलम शिंदे, वायरलेस ड्युटी प्रियंका धावडे, सीसीटीएनएसचे कानकाज वैशाली बोरकर, सोनम खंडागळे, यांनी कामकाज पाहिले.

नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक अजय गोरड यांनी जुन्नर तालुक्यातील सर्व महिला पोलीसांचे कार्य हे कौतुकास्पद असल्याचे सांगत सर्व महिलांचे कौतुक केले.तसेच नारायणगाव वारुळवाडी ग्रामपंचायत सेविका व आरोग्य विभागाच्या सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला.

कर्मचार्‍यांचा सन्मान
कार्यक्रमाचे आयोजन सत्यशील शेरकर युवा मंच, शिवजन्मभुमी युवा फाउंडेशन, मैत्री ग्रुप नारायणगाव यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरिक्षक अजय गोरड, उपसरपंच परशुराम वारुळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष एम.डी.भुजबळ, अ‍ॅड. सुजाता काळे, अ‍ॅड.सुनिता चासकर, अनिता जठार, नुतन बिरमल, वैभव जठार, निलेश संते, सुशांत हांडे, किशोर मेहेर, गणेश लोहोटे, अमोल पवार यांनी महिला पोलीस कर्मचार्‍यांना व नंतर ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

स्त्रीयांचे प्रश्‍न सोडविण्याचे प्रयत्न हवेत
यावेळी बोलताना अ‍ॅड.सुजाता काळे म्हणाल्या की, आज अनेक महिला डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षिका, नेता, अभिनेत्री, मंत्री, देशाच्या सर्वोच्च पदांवरदेखील आहेत. त्याचवेळी दुसरीकडे गावात अनेक स्त्रिया मुलांना जन्म देताना मरतात, हुंड्याच्या अभावी जळतात पण त्यांना न्याय मिळत नाही. त्यांच्या अधिकारांसाठी आंदोलन होत नाही असे का? जर आपण सर्वांगीण विकासाच्या गोष्टी करतो, तर ह्या स्त्रियांचा विकास ही आपली जबाबदारी नाही का? आत्मविश्‍लेषण केल्यास ही जबाबदारी आपली आहे, ग्रामीण भागातील स्त्रियांच्या प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.