महिला पोलिसाची हल्लेखोरांकडून हत्या

0

जेरुसेलम । जेरुसलेम शहरात एका इस्रायली पोलिस महिलेला पॅलेस्टिनी हल्लेखोरांनी भोसकून ठार केले, तर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तीन संशयित पॅलेस्टिनी हल्लेखोर ठार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. या हल्ल्याची जबाबदारी आयसिसने घेतली होती, पण हमास या संघटनेने त्यांचा दावा फेटाळला असून, तीनही हल्लेखोर स्थानिक इस्लामी व डाव्या चळवळीचे होते असे म्हटले आहे. रमजानमधील तिसर्‍या शुक्रवारी मुस्लिम त्यांचा उपवास सोडत असताना हा हल्ला झाला त्या वेळी हजारो पॅलेस्टिनी हे पूर्व जेरुसलेम व पश्चिम किनारा भागात अल अक्सा मशिदीत नमाजासाठी जमले होते.

भोसकून केली हत्या
ही मशीद म्हणजे इस्लाम धर्मासाठी जगातील तिसरे पवित्र स्थान मानले जाते. दमास्कस गेट येथे करण्यात आलेल्या हल्ल्यात सीमेवरील महिला पोलिस भोसकल्याने ठार झाली. तीन अरब दहशतवाद्यांना पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात ठार केले.

हल्लेखोरांचाही खात्मा
पोलिसांच्या मते दोघा हल्लेखोरांनी पोलिसांच्या गटावर गोळीबार सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. दरम्यान, तिसर्‍या हल्लेखोराने पोलिस महिलेला भोसकून ठार केले. तिसर्‍या हल्लेखोरालाही गोळय घालण्यात आल्या. जेरुसलेमचे पोलिस प्रमुख योराम हाल्वी यांनी सांगितले, की हल्लेखोर पॅलेस्टिनी होते. इस्रायलने पश्चिम किनारा भागात पॅलेस्टिनींवरचे येण्याजाण्याचे र्निबध शिथिल केले असून, त्यांना रमजाननिमित्त येण्यास परवानगी दिली आहे.